धरणाला ५० टक्के गळती ; ६० वर्षांत दुरुस्तीविना
रत्नागिरी:- सहा दशकांमध्ये पानवल धरणाची एकदाही मोठी दुरुस्ती केलेली नाही. धरणामुळे पालिकेची वर्षाला १ कोटी २० लाखाची आर्थिक बचत होते तरीही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने धरणाला ५० टक्के गळती सुरू आहे. नैसर्गिक उताराने (ग्रॅव्हिटी) शहराला पाणी पुरवणारे हे धरण आहे. तरी या धरणाच्या दुरुस्तीचा ६० वर्षामध्ये एकदाही विचार झाला नसल्यामुळे धरणाची भिंत कमकुवत झाली आहे.
सुमारे ००.५४० दशलक्ष घनमीटर एवढी या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता आहे; मात्र गळतीमुळे पाणीच साठून राहत नाही. परिणामी शीळ धरणावर ताण पडत असून पाणी उचल करण्यावर पालिकेला लाखो रुपयांचा भुर्दंड बसत आहे. ६० वर्षानंतर पानवल धरणाच्या दुरुस्तीबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणाची दुरवस्था झाली आहे. रेड झोनमध्ये नसले तरी धरणाची गळती चिंताजनक आहे.धरणाची भिंत, पाया आधी भागातून मोठ्या प्रमाणात गळती सुरू असल्याने पाणी साठून राहत नाही. त्यामुळे पावसाळ्यातच या धऱणाचा शहराला पाणी पुरवण्यासाठी चांगला वापर होत आहे. त्यानंतर महिनाभरातच पाणी तळ गाठते, अशी परिस्थिती
निर्माण झाली आहे. शहरासाठीच्या सुधारित पाणी योजनेमध्ये या धरणाच्या पाण्याचा विचार झाला आहे. पानवल आणि शीळ या दोन्ही धरणातून दरदिवशी सुमारे २२ एमएलडी पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी पानवल धरणातून किमान ६ महिने ग्रॅव्हिटीने पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे; मात्र गळतीमुळे चार ते पाच महिन्यातच धऱणाचे पाणी तळ गाठत असलयाने त्याच्या दुरुस्तीची गरज भासत आहे.
58 वर्षांमध्ये पानवल धरणाची दुरुस्ती किंवा गाळ काढण्यात आलेला नाही. धऱणाला ५० टक्के गळती लागली असल्याची माहिती नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी सर्वसाधारण सभेत दिली. यापूर्वी या धऱणाची मुख्य जलवाहिनी बदलण्यात आली आहे. त्यासाठी सुमारे २५ ते ३० लाखाहून अधिक खर्च करण्यात आला आहे. धरणाची दुरुस्ती झाली तर ठीक नाहीतर जलवाहिनीचा काहीच फायदा होणार नाही. हा खर्चफुकट जाईल, असे साळवी यांनी सभागृहात स्पष्ट केले होते. पानवल धरणाच्या दुरुस्तीचा पालिकेने ठराव केला आहे. आता पानवलचे पाणी अपेक्षेप्रमाणे मिळत नसल्याने शीळ धरणावर त्याचा ताण पडत आहे. विद्युत पंपांद्वारे जास्त वेळ पाणी उचलावे लागत असल्याने पालिकेवर बिलाचा भुर्दंड पडत आहे.