५६० मीरटचे काम;आता कोलकात्याहून पाईप मागविले
रत्नागिरी:- गेल्यावर्षी एन पावसाळ्यात शीळ जॅकवेल कोसळल्यामुळ पाणी पुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. शीळ नदीमध्ये प्लोटिंग जेटीवर पंप टाकून नवीन जॅकवेलमध्ये पाणी लिप्ट करून तात्पुर्ती पाण्याची व्यवस्था करण्यात आली. वर्ष झाले तरी अजून शीळ धरण ते जॅकवेलपर्यंत ५६० मीटरची पाईप टाकण्याचे काम पालिका प्रशासनाला करता आलेले नाही. वेळीच हे काम न झाल्यास पावसाळ्यातील पुरात प्लोटिंग जेटी राहील का ? असा प्रश्न आहे. हा विषय चर्चेत आल्याने पालिकेने तत्काळ कोलकात्याहून एमएस पाईप मागविले आहेत. पाईप आल्यानंतर ४ दिवासात काम होणार आहे.
रत्नागिरी शहराला शीळ मुख्यत्व धरणातून पाणी पुरवठा सुरू आहे. परंतु गेल्या वर्षी पावसाळ्यातच शीळ जॅकवेल कोसळले आणि शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाला. या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी पालिकेचे अधिकारी, मुंबईहून प्लोटिंग जेटीवर पंप बसविण्यासाठी आलेली टीम, पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी यामध्ये जातीने लक्ष घातले. त्यामुळे त्यांचे शिलेदार देखील यामध्ये लक्ष देऊन होते.
शहरवासीयांच्या पाण्याचा प्रश्न तत्काळ सोडविणे हा एकच उद्देश होता. सुधारित पाणी योजनेंतर्गत जुन्या जॅकवेलच्या जवळच नवीन जॅकवेल बांधण्यात आले होते. त्यामुळे तत्काळ या जॅकवलेवर नवीन पंप बसवून जॅकवलेमध्ये शीळ नदीतून पाणी आणण्यासाठी प्लोटिंग पंप टाकण्यात आले. २४ तास काम सुरू होते. त्यामुळे लगेचच शहरातील पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात आला. यासाठी आठ दिवस वेगवेगळे हात राबत होते.
मुळात शीळ जॅकवेलमध्ये पाणी आणण्यासाठी शीळ धरण ते जॅकवेल अशी ५६० मीटरची पाईपलाईन टाकण्यात येणार होती. सुधारित पाणी योजनेतील हे काम आहे. परंतु वर्ष झाले तर त्याकडे तेवढ्या गांभीर्याने लक्ष देण्यात आलेले नाही. दुसरा पावसाळा आला तरी प्लोटिंग पंपावरच शहराचा पाणी पुरवठा सुरू आहे. पावसात पूरस्थिती निर्माण झाली तर हे प्लोटिंग जेटी राहिल का ? पावसाळ्यात जेटी पुरात वाहून जाण्याची भिती आहे. त्यामुळे पुन्हा शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. प्रसार माध्यमांनीही बाब पालिकेच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने ५६० मीटरचे खोदकाम सुरू केले असून चर मारून झाले आहेत. एमएस पाईप कोलकात्याहून तीन दिवसात येतील. त्यानंतर ४ दिवासत ती टाकुन होईल, असे पालिका प्रशासनाने सांगितले.