सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष: निखिल बोरकर
रत्नागिरी:- तालुक्यातील वरवडे ते जयगडकडे जाणारा रस्ता अतिशय धोकादायक बनला आहे. मागील अनेक महिने या रस्त्यावर ठीकठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यातून वाहन चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी माजी सरपंच निखिल बोरकर तसेच येथील स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. या रस्त्यालगत मागील काही दिवसांपासून खोदकाम सुरू आहे. या खोदकामामुळे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्याच्या बाजुला साईड पट्टी लगत चर मारण्यात आले आहेत. या चरांमुळे गाड्यांचा अपघात होण्याचा मोठा धोका आहेच परंतु, या चरांमध्ये गाई – गुरे अडकून पडत आहेत. यामुळे येथील स्थानिक ग्रामस्थ प्रचंड हैराण झाले आहेत. चरांमध्ये अडकेलेली जनावरे बाहेर काढताना ग्रामस्थांना मेहनत घेताना आर्थिक त्रास देखील सहन करावा लागत आहे.
रस्ता दुरुस्त करावा यासाठी येथील ग्रामस्थांनी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून, प्रत्यक्ष भेटून अद्यापही या रस्त्याची कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. यामुळे येथील ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले आहेत. पुढील चार दिवसात रस्त्याची दुरुस्ती हाती न घेतल्यास स्थानिक ग्रामस्थांना घेऊन बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्याकडे बांधकामच्या अधिकाऱ्यांची तक्रार करणार असल्याचे माजी सरपंच निखिल बोरकर यांनी सांगितले आहे.