चिपळूण:- वन विभाग कोळसा भट्ट्यांच्या विरोधात अॅक्टिव्ह मोडवर आलेला असताना देखील टेरव, अडरे गावच्या सीमेवर कोळसाभट्ट्या धगधगत असल्याचे पुढे येत आहे. वन विभागाने टाकलेल्या धाडीत या ठिकाणी कोळसा भट्टी आढळून आली. तेथील कोळसा वन विभागाने जप्त केला आहे.
कोकणात कोळसा भट्टी लावण्यास बंदी आहे. तरीही बेकायदेशीरपणे जंगलतोड करून कोळसा भट्टा लावल्या जात असल्याची तक्रार येथील ग्रामस्थांनी केली होती. या विरोधात काहींवर गुन्हा देखील दाखल झाला होता. तरीही कोळसा भट्ट्या धगधगत आहेत. टेरव, अडरे सीमेवर कोळसा भट्टी सुरू असल्याची माहिती मिळताच वन विभागाने धाड टाकली व कोळसा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी संतोष राजाराम कदम (रा. टेरव तालुका चिपळूण) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.