चिपळूण:- परशुराम घाटात रविवारी वणवा लागलेला असताना सोमवारी अलोरे वरचीवाडी येथे लागलेल्या भीषण वणव्यात कातकरी टेप येथील दोन खोपटी, तसेच वणवा आटोक्यातत आण्यासाठी गेलेल्या तरुणाची दुचाकी जळून खाक झाली.
दरम्यान या वणव्यात आंबा बागायतींचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, सोमवारी दुपारी कराड मार्गावर सती येथील डोंगरातही वणवा लांगला. दोन्ही आगीच्या ठिकाणी चिपळूण नगर परिषदेच्या अग्निशमन बंबाने धाव घेत हा वणवा आटोक्यात आणला.
यापूर्वी परशुराम, वालोपे, दळवटणे येथे लागलेल्या वणव्याची पुनरावृत्ती रविवारी परशुराम घाटात घडली. तेथील वणवा नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने विझविलेला असताना सोमवारी पुन्हा दुपारी कराड रस्त्यावर सती परिसरात वणवा लागला. याबाबतची माहिती नगरपरिषदेला कळताच बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर अग्नीशमनने वणवा विझविला.
त्यानंतर अलोरे वरचीवाडी येथे दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वणवा लागल्याचे कळल्यानंतर क्रांती युवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वणवा विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. याच दरम्यान प्रितम आंब्रे हा तरुण आपली दुचाकी लावून वणवा विझविण्यासाठी गेला असता या वणवण्यात त्याची दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. याचबरोबर कातकरी टेप येथील सुभाष पवार, धोंडीराम पवार यांच्या दोन लाकडाच्या खोपट्या जळून खाक झाल्या. तसेच परिसरातील आंबा कलमांना, आगीची झळ पोहचली.