लोडरच्या चाकाखाली सापडून कामगाराचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड येथील आंग्रे पोर्टजवळ चालकाच्या निष्काळजीपणामुळे कामगाराचा लोडरच्या मागील चाकाखाली येऊन मृत्यू झाल्याची घटना सोमवार 17 जानेवारी रोजी सकाळी 5 वा. घडली. याप्रकरणी लोडर चालकाविरोधात जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिवाकर भूषण पासवान (45, मूळ रा. बिहार सध्या रा. आंग्रे पोर्ट, सांडेलावगण, रत्नागिरी ) असे मृत्यू झालेल्या दुर्दैवी कामगाराचे नाव आहे. तक्रारीनुसार, सोमवारी सकाळी 5 वा. त्याचे वडील आंग्रे पोर्ट येथे लोडरमधून साखरेची पोती उतरवत होते. त्यावेळी सनोजकुमार लोडर मागे घेत असताना लोडरच्या मागील चाकाखाली येऊन दिवाकर पासवानचा मृत्यू झाला. याप्रकरणी लोडर चालक सनोज कुमार विरोधात जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या विरोधात मयत कामगाराचा मुलगा दिलखुष दिवाकर पासवान (18, मूळ रा. बिहार सध्या रा. आंग्रे पोर्ट, सांडेलावगण, रत्नागिरी ) याने जयगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार रमेश गावित करत आहेत.