लोटे औद्योगिक वसाहत स्फोटाने हादरली; कोट्यावधी रुपयांचे नुकसान

खेड: तालुक्यात असलेली लोटे एमआयडीसी एका पाठोपाठ एक झालेल्या स्फोटांनी हादरली आहे. रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास लोटे एमआयडीसी येथील प्लॉट नंबर 39 येथील प्रिवी ऑर्गानिक्स लिमिटेड कंपनीला भीषण आग लागली.

कंपनीत सहा ते सात स्फोट झाले आणि भीषण आग लागली. ही इतकी मोठी होती की, तब्बल दहा किलोमीटर लांबून आगीच्या धुराचे लोट दिसून येत होते. या आगीमध्ये कंपनीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झालेले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाहीये अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

कंपनीतील सॉल्व्हंट केमिकलच्या ड्रम ठेवलेल्या विभागांमध्ये आग लागली आणि स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली. ज्या कंपनीत स्फोट होऊन आग लागली त्याच्या शेजारीच सीएनजी गॅस कंपनी असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. आगीची माहिती मिळताच खेड, चिपळूण तालुक्यातील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मोठ्या शर्थीने अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आता नियंत्रणात आणली. तब्बल चार तासांनंतर ही आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. लोटे एमआयडीसीमध्ये अपघातांचे आणि स्फोटांचे प्रमाण वाढत असून गेल्या वर्षभरात सहाहून अधिक मोठे स्फोट झाले असून त्यात 20 हून अधिक लोकांचा जीव यापूर्वी गेला आहे. वारंवार होणाऱ्या या दुर्घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.