लोटे औद्योगिक वसाहतीत वायू गळती

खेड:- लोटे औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड (येलोस्टोन फाईन केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड) या कंपनीत शनिवारी  सायंकाळी ४.४५ च्या सुमारास वायू गळती झाली. या घटनेत एका कामगाराला वायूची बाधा झाल्याचे समजते, परिसरात धुराचे मोठे लोळ पसरले होते. या धुरामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

या वायू गळतीमुळे कंपनीच्या आजूबाजूच्या परिसरात धुराचे मोठे लोळ पसरले होते. त्यामुळे नागरिकांच्या डोळ्यातून पाणी येत होते आणि श्वास घेण्यास त्रास होत होता, असे ग्रामस्थ संजय आंब्रे यांनी सांगितले. कंपनीने यापुढे असे प्रकार होऊ नये, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या घटनेबाबत लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीचे वरिष्ठ साइट प्रमुख दीपक पाटील यांनी सांगितले की, “कंपनीत प्रक्रिया सुरू असताना रिॲक्टरमधून वायू बाहेर पडला. आम्ही पोलिस, प्रशासन आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. परिस्थिती नियंत्रणात असून, तांत्रिक बाबी तपासल्यानंतर नेमके कारण समजू शकेल.”

या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, कंपनी व्यवस्थापनाने त्यांना अद्याप घटनास्थळी नेलेले नाही. पोलीस आणि प्रशासनाकडून या घटनेचा तपास सुरू आहे.