चिपळूण:- लोटे एमआयडीसीतील सुप्रिया केमिकल कंपनीत अचानक स्फोट होऊन आग लागल्याने खळबळ उडाली आहे. आगीचे नेमके कारण समजलेले नाही मात्र कंपनीतील दोघे कामगार गंभीर जखमी झाले आहेत. दोघांपैकी एकाला चिपळूणला तर दुसर्याला सांगली येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ११:३० च्या सुमारास कंपणीच्या बाँयलरमध्ये स्फोट होवून मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागला. त्यानंतर कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये धावाधाव सुरु झाली. स्फोटानंतर दोघेजण गंभार जखमी झाल्यानंतर त्या दोघाना उपचारासाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकाची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला तातडीने सांगलीला हलविण्यात आले आहे.
आगीची माहिती मिळताच लोटे अग्नीशमन केंद्राचे प्रमुख आनंद परब यांनी दोन अग्निशमन बंब घटनास्थळी पाठवले. अर्ध्या तासात ही आग आटोक्यात आली मात्र धूर येण्याचा प्रकार सुरू आहे.