लोटे एमआयडीसीतील घरडा कंपनीत भीषण स्फोट; तिघांचा जागीच मृत्यू

उपचारादरम्यान एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

चिपळूण:- लोटे एमआयडीसीतील घरडा कंपनीत आज सकाळी प्रचंड मोठा स्फोट झाला. या अपघातात तब्बल पाच जण गंभीररित्या भाजले. यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी कामगाराचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. एका गंभीर जखमीस पुढील उपचारासाठी पनवेल येथे पाठवण्यात आले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र अपघाताची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.

शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. घरडा कंपनीच्या प्लँट नं. 7 बी येथे मटेरियल चार्जिंग करणाऱ्या रिॲक्टरमध्ये स्फोट झाला, असा प्राथमिक अंदाज आहे. या स्फोटामुळे आग लागली आणि तेथे काम करणाऱ्यां कर्मचाऱ्यांपैकी तिघेजण जळून जागीच ठार झाले. त्यांचे चेहरे पूर्ण भाजले असल्याने त्यांची ओळख पटली नव्हती. अन्य दोघेजण अतिगंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी ऐरोली येथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. पण दरम्यान एका गंभीर जखमी कामगाराचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

यापूर्वी 10 मार्च रोजी ठाणे येते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसरातील केमिकल फॅक्टरीत आग लागली होती. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या 5 गाड्यांना आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जोरदार संघर्ष करावा लागला. कारखान्यातील बॉयलरमध्ये आग लागली होती आणि थोड्याच वेळात संपूर्ण कारखान्यात ती आग पसरली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.