लोटे एमआयडीसीतील कंपनीत स्फोट; दहा ते बारा कामगार जखमी

खेड:- लोटे एमआयडीसी येथील डिवाईन कंपनीत रविवारी सकाळी स्फोट होऊन 10-12 कामगार होरपळल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटात आणखी काही कामगार जखमी झाल्याचे समजत आहे. काही कामगारांना लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर काही कामगारांना अपराध हॉस्पिटल चिपळूण येथे दाखल करण्यात आले आहे.

लोटे येथील डीवाईन केमिकल कंपनीत सॉलवंट केमिकलने पेट घेतल्याने हा स्फोट झाल्याचे समजते. जखमीपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती उपलब्ध झाली असून प्राथमिक माहितीनुसार तिघांना वाशी येथील बर्न हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.

आज सकाळच्या शिफ्टमधील कामगार फेब्रिकेशनचे काम करत असताना अचानक सॉलवंट केमिकलने घेतला पेट घेतला आणि ही दुर्घटना घडली. या अपघातात पहिल्या पाळीत काम करणारे सुमारे १० ते १२ कामगार होरपळून जखमी झाले. जखमी झालेल्या कामगाराना कंपनी व्यवस्थापनाने तात्काळ चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात उपचारांसाठी नेले मात्र जखमी कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याने लाईफ केअर रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने जखमी कामगारांना दाखल करून घेण्यास असमर्थता दाखवली. त्यानंतर काहीजणांना अपरान्त रुग्णालयात तर काहीजणांना चिपळूण शहरातील एस एम एस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी कामगारांपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना वाशी येथील बर्न हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दुर्घटनेनंतर कारखान्याच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.