लोककलांच्या संवर्धनासाठी वचनबद्ध: ना. उदय सामंत

जाकादेवी येथे नमन लोककला मंचाच्या पुरस्कारांचे वितरण

रत्नागिरी:- नमन लोककला कला मंचाने गेल्या तीन वर्षात नमन लोककला जोपासण्यासाठी महत्त्वाचे प्रयत्न केले आहेत. नमन, जाखडी या लोककलांना राजाश्रय मिळवण्यासाठी मी प्रयत्न केले. लोककला म्हणून शासनाची यादीत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या लोककलांचा समावेश केला. सगळ्यात जास्त लोककलावंतांना आधार देणारा मी एकमेव लोकप्रतिनिधी आहे. नमन लोककला जोपासणाऱ्यांना शोधून काढून आम्ही त्यांना मानधन सुरू केले. नमन ही लोककला केवळ महाराष्ट्रातच न राहाता ती देशांमध्ये जावी, परदेशामध्ये पोहोचावी, यासाठी सर्वांनी येऊन प्रयत्न करावेत. मी तुमच्यासोबत आहे, असे राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी टाळ्यांच्या कडकडाटात सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या काळात काही उमेदवारांनी मुंबईतून गायक कलाकार आणले, परंतु दोन स्थानिक कलाकारांनी माझ्यावर गाणे तयार केले आणि या दोन गाण्यांच्या जीवावर मी निवडणूक जिंकलो. आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातच टॅलेंट आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

नमन लोककला मंच रत्नागिरी तालुका शाखा रत्नागिरीच्यावतीने शनिवारी जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालयाच्या भव्य मैदानावर बहुआयामी महानमन आयोजित करण्यात आले होते. या वेळी पालकमंत्री ना. उदय समंत यांच्या हस्ते संस्थेच्या लोककला गौरव भूषण व युवा लोककलारत्न गौरव पुरस्कार २०३४-२६ च्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबू म्हाप, भाई जठार, नमन लोककला मंचाचे जिल्हाध्यक्ष पी. टी. कांबळे, उपाध्यक्ष युयुत्सु आर्ते, मोहन घडशी, बंधू मयेकर, अनिल देसाई, दत्तात्रय देसाई, अरुण कळंबटे, प्रकाश कोल्हे, महादेव गोताड, सेक्रेटरी परशुराम मासये, शिवाजी मासये, रवींद्र कोटकर, प्रकाश गोताड, मनसे तालुकाध्यक्ष रुपेश जाधव, ज्योती पाचपुरे, विद्या बोंबले, कैलास खेडेकर, दत्तात्रय देसाई, आप्पा घाणेकर, उमेश देसाई, बाबा भागडे, मनोहर गोताड, प्रतीक देसाई, मिलिंद खानविलकर, परशुराम कदम आदी उपस्थित होते.

पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी नमन लोककला मंचच्या माध्यमातून तीन वर्षे लोककला जपणाऱ्या प्रभाकर कांबळे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक केले. हजारोंच्या संख्येने नमन पाहाण्यासाठी आज असलेली उपस्थिती, हेच या संस्थेच्या कामाचे यश आहे, असेही त्यांनी सांगितले.

या वेळी लोककला गौरव भूषण पुरस्काराने नितीन बांडागळे संगमेश्वर, लक्ष्मण केशव मासे राजापूर, भिकाजी तानू भुवड चिपळूण, हरिश्चंद्र विठ्ठल बंडबे रत्नागिरी, कृष्णा कानू राडये लांजा, संजय यशवंत पेजले गुहागर यांचा सन्मान करण्यात आला, तर युवा लोककला रत्न पुरस्काराने संकेत गोपाळ संगमेश्वर, राजेंद्र भालेकर देवरुख, रुद्र बांडागळे चिपळूण, सुनील गांगरकर संगमेश्वर, श्रीकांत बोंबले रत्नागिरी, महेश कांबळे रत्नागिरी, शैलेश शितप संगमेश्वर, संजय भागडे चिपळूण, तानाजी गुडेकर चिपळूण, मयुरेश गोणबरे गुहागर, अविनाश कारकर गुहागर, संतोष गुरव, लांजा, रमेश मासये राजापूर, पिलाजी लोळगे राजापूर, रतन मंचेकर लांजा आदींचा सन्मान करण्यात आला. यानंतर राम शिंदे लिखित व अजित पाटील दिग्दर्शित शिवराज योगी हे ऐतिहासिक वगनाट्य, तत्पूर्वी गण, गवळण सादर झाली.