लॉकडाऊन 15 एप्रिल पर्यंत वाढवला; जिल्हाधिकाऱ्यांकडून नवी नियमावली जाहीर

रत्नागिरी:- जिल्ह्यातील लॉकडाऊन 15 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी बुधवारी केली. लॉकडाऊन कालावधी वाढवताना जिल्हाधिकारी यांच्याकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 

जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या नवीन आदेशानुसार दुकानामध्ये अथवा दुकान परिसरात 5 पेक्षा अधिक व्यक्ती असल्यास कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय ग्राहकांमध्ये 6 फुटापेक्षा जास्त अंतर राखणे बंधनकारक असणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हे दंडनीय असून सार्वजनिक ठिकाणी दारू, तंबाखूजन्य पदार्थ खाण्यास व थुंकण्यास प्रतिबंध असणार आहे.

शक्य त्या ठिकाणी घरातून काम करावे, कार्यालयातील सार्वजनिक ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, हॅन्डवॉश, सॅनिटायझर उपलब्ध ठेवावे, कार्यालयात वारंवार निर्जंतुकीकरण करावे, रात्री 8 ते सकाळी 7 जमावबंदी असून याचे उल्लंघन करणाऱ्याला 1000 दंड ठोठावण्यात येणार आहे. उद्याने व सार्वजनिक ठिकाण रात्री 8 ते सकाळी 7 या कालावधीत बंद राहतील, मॉल्स, सभागृह, हॉटेल्स रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत बंद राहतील मात्र हॉटेल्स मधून होम डिलिव्हरी सुरू राहील. लग्न समारंभात 50 पेक्षा अधिक लोकांना उपस्थित राहण्यासाठी परवानगी नाही. अंतिम संस्कारासाठी केवळ 20 जण हजर राहण्यास परवानगी असणार आहे.