लॉकडाऊनमध्ये शिवभोजन थाळीने भागवली गरजूंची भूक

जिल्ह्यातील 20 केंद्रांवर 3 लाख 50 हजार थाळ्यांचे वाटप

रत्नागिरी:- कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्याने संपूर्ण देशामध्ये टाळेबंदी जाहीर करण्याची वेळ आली. हे संकट ‘न भूतो न भविष्यति’, असे आहे. या लॉकडाउनचा परिणाम थेट सर्वांच्या रोजगार आणि व्यवसायांवर झाला. हातावर पोट असणार्‍या सर्वांची स्थिती अधिक बिकट आणि दयनीय झाली. या सर्वांच्या मदतीला धावून आली ती ‘शिवभोजन थाळी’.

1 एप्रिलपासून आतापर्यंत जिल्ह्यातील 20 केंद्रांवर 3 लाख 50 हजार थाळ्यांनी अनेक गरजूंची भूक भागवली. राज्यात सत्तेवर येताना 10 रुपयांमध्ये गरीबांना जेवण पुरवणारी नावीन्यपूर्ण अशी शिवभोजन थाळी ही योजना सुरू झाली. ज्यांना उपजीविकेचे कोणतेही साधन उपलब्ध नाही, अशा गरिबांसाठी ही योजना सुरू करण्यात आली. गरिबांना एक वेळच्या जेवणाची व्यवस्था ती देखील अत्यंत माफक दरात देणारी ही शिवभोजन थाळी योजना आरंभापासून सर्वांना आधार देणारी ठरलेली आहे. टाळेबंदीत हाताला काम नाही, अशा स्थितीत यात अधिक सवलत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि 10 रुपयांना असणारी ही थाळी 5 रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली.

योजना सुरू झाली त्या वेळी जिल्ह्यात 3 ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्रे सुरू झाली; मात्र लॉकडाउनदरम्यान इतर प्रांतात स्थलांतरित होणारे मजुर आणि ज्यांचे व्यवसाय पूर्ण ठप्प झाले अशांची संख्या वाढली. त्यामुळे जास्त ठिकाणी ही सुविधा असावी, अशी मागणी येताच शासनातर्फे याचा विस्तार तालुक्यांच्या ठिकाणीही करण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील 9 तालुक्यांच्या ठिकाणांसह 20 शिवभोजन थाळी केंद्रे सुरू केली. 22 मार्चनंतर सर्वत्र लॉकडाउन सुरू झाल्याने अतिशय गतिमान पद्धतीने निर्णय घेऊन या सर्व ठिकाणी शिवभोजन थाळी उपलब्ध झाल्याने या कठीण काळात गरिबांना या योजनेने मोठा आधार दिला. 1 एप्रिलपासून आतापर्यंत या 20 केंद्रांवर 5 रुपयात शिवभोजन थाळी मिळत आहे. अशा साधारण 3 हजार थाळ्यांच्या माध्यमातून हातावर पोट असणार्‍या सर्वांना भोजन मिळत आहे. जिल्ह्यात या अंतर्गत आतापर्यंत 3 लाख 50 हजार थाळ्यांचे वाटप झाले आहे. वाटीभर वरण, एक भाजी, भात आणि चपाती दिली जाते.