लैंगिक अत्याचारप्रकरणी पीडित तरुणीचा न्यायालयासमोर जबाब नोंदवणार

रत्नागिरी:- लैंगिक अत्याचार प्रकरणी तरूणीचा न्यायालयासमोर जबाब नोंदविला जाणार आहे. तपासाला गती मिळावी यासाठी वैद्यकीय अहवाल लवकरात लवकर मिळावा, यासाठी फॉरेन्सिक लॅबशी पत्रव्यवहार केला आहे. आतापर्यंत या प्रकरणी १० जणांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदविले आहेत. व्हॉट्सॲप कंपनीकडून कॉल रेकॉर्ड मागविण्यात आले आहे. येत्या चार दिवसांमध्ये या प्रकरणाचा उलघडा होईल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.

रत्नागिरी शहर आणि जिल्हा सुरक्षित आहे. असुरक्षित म्हणण्याचे कारण नाही. त्यासाठी पोलिस यंत्रणा २४ तास राबत आहे. पोलिसांवर जनतेने विश्वास ठेवावा, असे आवाहन देखील त्यांनी केले.

जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. रत्नागिरी शहराजवळील चंपक मैदानमध्ये एका नर्सिंगच्या तरूणीवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघड झाला. या घटनेने संपुर्ण शहर आणि जिल्हा हादरला. पोलिस दलाच्या कार्यपद्धतीकडे जमावाने बोट दाखविले, रास्ता रोको केले. परंतू हा प्रकार अतिशय संवेदनशील असल्याने पोलिस बारकाईने आणि गांभिर्याने तो हाताळत आहे. पीडित तरूणीने दिलेल्या जबाबाला अनुसरून पोलिस तपास करत आहेत. जो मार्ग पीडित तरूणीने दिल्या त्या मार्गावरील ६ सीसी टीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाले आहेत. दिलेला जबाब आणि प्रत्यक्षस्थिती यामध्ये काही प्रमाणात तफावत आढळून येत आहे. मोबाईल रेकॉर्ड तपासल्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत १० जणांची चौकशी करून जबाब नोंदविले आहेत. यामध्ये नेमकी वस्तूस्थिती काय आहे, नेमका काय प्रकार घडला हे पोलिस लवकरच उघड करणार आहे. त्यासाठी त्यांनी वैद्यकीय अहवाल तत्काळ मिळावा म्हणून फॉरेन्सिक लॅबला पत्र दिले आहे. व्हॉट्सॲप कंपनीकडून कॉल रेकॉर्ड मागविले आहेत. घटना क्रमामधील जे धागे आहेत ते जोडण्याचा पोलिसांचा प्रयत्न आम्ही करत आहोत. वैद्यकीय अहवला आणि कॉल रेकॉर्ड मिळाल्यानंतर तपास करणे सोपे जाईल. आणखी चार दिवसांमध्ये लैंगिक अत्याचाराचा प्रकार सर्वांसमोर येईल, असा विश्वास श्री. कुलकर्णी यांनी व्यक्त केला.