खेड:- लुप्तप्राय माशाच्या उल्टीची तस्करी करणाऱ्या तिघा जणांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. खेड तालुक्यातील भरणे नाका ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून माशाची उल्टी देखील ताब्यात घेण्यात आली.
खेड पोलीस ठाणे हद्दीमधील भरणे नाका येथील एका रिसॉर्टच्या नजीक काही व्यक्ति लुप्तप्राय प्रजातीच्या माशाची उलटी अर्थात अंबरग्रीसची विक्रीकरिता येणार आहेत अशी गुप्त बातमी मिळाली. त्यानंतर लागलीच खेड पोलीस ठाणे येथील पो.उप.निरीक्षक श्री. सुजीत सोनवणे यांनी पोलीस अधीक्षक रत्नागिरी, श्री. धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक, खवटी, खेड श्री. रानबा परशुराम बर्गेकर यांचे सह, खेड पोलीस ठाणे यांचे एक पथक तयार केले व या पथकासह खेड पोलीस ठाणे हद्दीमधील भरणे नका येथील रिसॉर्ट च्या जवळ सापळा रचला. भरणे नाका येथील साई रिसॉर्ट जवळून 3 इसमांना संशयितरित्या 2 दुचाकीवरून जाताना या पथकाने थांबविले व लागलीच त्यांची झडती घेता, त्यांच्या ताब्यात असलेल्या एका पिशवीत “लुप्तप्राय प्रजातीच्या माशाची उलटी (अंबरग्रीस)” मिळून आली.
या कारवाई मध्ये, 3 पर जिल्ह्यातील इसमांना, वन्य जीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 2 (16), 39, 40 (2), 44(1), 48 (31) (1), 49, 49 (a), 51 a 52 प्रमाणे खेड पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करून, 2 दुचाकी व मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच या गुन्ह्यामधील अन्य सहभागी व्यक्तींचा शोध घेण्याकरिता अधिक तपास करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस उप निरीक्षक, श्री. सुजीत सोनवणे, खेड पोलीस ठाणे, श्री. रानबा परशुराम बंबर्गेकर, वनरक्षक, खवटी, खेड, पोकॉ मोरे, पोलीस मुख्यालय, रत्नागिटी, पोकॉ जोगी, खेड पोलीस ठाणे, पोकॉ माने, खेड पोलीस ठाणे, जगताप, खेड पोलीस ठाणे व पोकॉ कोटे, खेड पोलीस ठाणे.यांनी या कारवाईत भाग घेतला.