लायसन्ससाठी आता आरटीओ कार्यालय विसरा!

खासगी संस्थांकडून मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स; १ जूनपासून अंमलबजावणी

रत्नागिरी:- ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी वाहन चालकाला लेखी परीक्षेपासून ते वाहन चालवण्याची चाचणी द्यावी लागते. या सर्व प्रक्रियेत आठवडा तर नक्कीच निघून जातो. परंतु, आता वाहन चालकाची या सर्व प्रक्रियेतून सुटका होणार आहे. त्यानुसार आरटीओ कार्यालयात जाऊन व्यक्तींना ड्रायव्हिंग चाचणी देण्याची गरज पडणार नाही. खासगी संस्थांना चाचण्या घेण्यास आणि प्रमाणपत्र देण्यास सांगण्यात आले आहे आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ड्रायव्हिंग लायसन्सबाबतच्या नियमात मोठे बदल केले आहेत.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ड्रायव्हिंग लायसन्सबाबतच्या नियमात मोठे बदल केले आहेत. हा नियम येत्या दि.१ जूनपासून लागू होणार आहे. या नव्या नियमानुसार, वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने गाडी चालवली तर चालकाला एक हजार ते दोन हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागेल. तसेच एखादा अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवताना पकडला गेल्यास त्याला २५ हजार रुपये दंड भरावा लागेल. इतकेच नव्हे तर, ज्या व्यक्तीचे वाहन आहे. त्या व्यक्तीचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले जाईल. या नियमानुसार अल्पवयीन मुलांना ड्रायव्हिंग लायसन्स काढता येणार नाही.

यासह खासगी दुचाकी वाहनचालक प्रशिक्षण केंद्राकडे किमान एक एकर जमीन असायला हवी. मोटार वाहनचालक प्रशिक्षण केंद्राकडे दोन एकर जमीन असायला हवी. याबरोबर वाहन चालकाच्या चाचणीसाठी आवश्यक सुविधा प्रशिक्षण केंद्राकडे असायला हव्यात. दरम्यान, प्रशिक्षण केंद्राकडे प्रशिक्षकांकडे हायस्कूल डिप्लोमा गरजेचे असेल. तसेच त्याच्याकडे किमान पाच वर्षांचा वाहन चालवण्याचा अनुभव असायला हवा. प्रशिक्षकांना बायोमेट्रिक्स आणि माहिती तंत्रज्ञान प्रणालीशी संबधित सर्व माहिती असायला हवी. या सर्व बाबी तपासूनच प्रशिक्षकाची निवड केली जावी. या सर्व नियमानमुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल तसेच लहान मुलांकडे गाडी देण्याच्या प्रमाणात ही घट होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.