रत्नागिरी:- जिल्ह्यात सरत्या वर्षभरात लाचखोरीचे प्रमाण अत्यल्प असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट लाचखोरीची प्रकरणे उघड झाली आहेत. १ जानेवारी ते डिसेंबर २०२२ पर्यंत जिल्ह्यात लाचखोरीची ६ प्रकरणे उघडकीस आली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात कमी ३ प्रकरणे उघडकीस आली. कोकण विभागात वर्षभरात एकूण ८४ प्रकरणात लाचखोरांवार कारवाई करण्यात येऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश आले आहे. कोकणात सर्वाधिक ठाणे जिल्ह्यात लाच घेतल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत.
लाचलुचपत प्रतिबंध विभाग लाचखोरीला प्रतिबंध घालण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहे. वारंवार आवाहन करत असले तरी लाचखोरी कमी होताना दिसत नाही. एखाद्याचे काम लवकरात लवकर करण्यासाठी किंवा कायद्याच्या चाकोरीत बसवण्यासाठी लाचेचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. म्हणून शासकीय कारभारात लाच हे समीकरण काही नवीन नाही. पैसे दिल्याशिवाय कागद हलतच नाही, अशी अनेक उदाहरणे समोर येत आहेत. त्यासाठी शासनाचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी सतत कार्यरत आहेत; परंतु लाचखोरीचे प्रकरण काही थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या वर्षीची म्हणजे २०२१ची आकडेवारी पाहता काही ठिकणी ही प्रकरणे कमी झाली आहेत तर काही ठिकाणी वाढली आहेत.
कोकण विभागात ६ जिल्ह्यांचा सामावेश आहे. त्यामध्ये सर्वांत कमी लाचखोरीची प्रकरणे झालेला जिल्हा आहे तो सिंधुदुर्ग जिल्हा. गेल्या वर्षी ही तीन आणि यावर्षीही अशी ३ प्रकरणे उघड झाली आहेत तर रत्नागिरी जिल्ह्याचे चित्र वेगळे आहे. गेल्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यात लाचखोरीची ३ प्रकरणे घडली होती; मात्र यावर्षी त्यामध्ये वाढ होऊन ६ लाचखोरांना पकडण्यात आले. सर्वांत जास्त लाचखोरांमध्ये ठाणे जिल्ह्याचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी ठाण्यात ४० लाचखोरांचा पर्दाफाश केला होता तर यंदा ३९ लाचखोरांचा समावेश आहे. त्यानंतर पालघर जिल्ह्यात गतवर्षी १४ तर यंदा १५ प्रकरणे झाली आहेत. नवी मुंबईमध्ये गतवर्षी १३ तर यंदा १० प्रकरणे आहेत. रायगड जिल्ह्यात गतवर्षी १० तर यंदा ११ लाचखोरीची प्रकरणे उघड झाली आहेत. गेल्या वर्षी कोकणात ८७ तर यंदा ८४ प्रकरणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाने उघड केली आहेत.