लांजा:- लांजा पोलिसांनी तालुक्यातील साटवली भंडारवाडी येथे घरावर धाड टाकून घरामधून हजारो रुपयांचा दारू साठा जप्त केला आहे. बुधवारी २८ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या दरम्याने ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईत पोलिसांनी गावठी दारूसह गोवा बनावटीचा ५० हजार ६८४ रुपयांचा दारू साठा पोलिसांनी जप्त केला आहे.
लांजा तालुक्यातील साटवली भंडारवाडी येथे विनापरवाना गावठी तसेच गोवा बनावटीच्या दारूची विक्री केली जात असल्याची खबर लांजा पोलिसांना मिळाली होती. यानुसार लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुगडे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस्विनी पाटील व पथकाने बुधवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास
साटवली भंडारवाडी येथे दिनेश कृष्णात आंबोळकर आणि पत्नी सौ दीप्ती दिनेश आंबोळकर (वय४४) यांच्या घरावर धाड टाकली. या धाडीत लांजा पोलिसांना हजारो रुपयांचा मद्य साठा आढळून आला गावठी दारूसह देशी विदेशी मध्याच्या बाटल्या देखील या ठिकाणी आढळून आल्या. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
जप्त करण्यात आलेल्या मद्यसाठ्यात ५५५० रूपये किंमतीची गावठी हातभट्टीची दारु, तसेच लेमन व्होडका, ऒल्ड मंक, इम्पेरियल ब्ल्यू, हायवर्ड व्हिस्की, राॅयल स्टॅग, डीएसपी व्हिस्की,मॅकडाॅल्ड व्हिस्की या गोवा बनावटीच्या १८०, ९०, ७५० मिली मापाच्या ९३२ बाटल्या ज्यांची किंमत ४४ हजार ९०४ रूपये इतकी आहे. व इतर साहित्य असा एकूण ५० हजार ६८४ रुपयांचा दारू साठा पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी लांजा पोलीसांनी दिनेश कृष्णात आंबोळकर आणि पत्नी सौ दीप्ती दिनेश आंबोळकर यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५(ई), ८१, ८३ प्रमाणे २८ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता गुन्हा दाखल. केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव हे करत आहेत.