रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील खोपोलीनजीक कुरवले फाटा येथे रस्त्यावर म्हशीला धडक लागून झालेल्या कार अपघातात लांजा येथील महिलेचा मृत्यू झाला. अपघाताची घटना बुधवारी रात्री २.३० च्या सुमारास घडली होती. सलोनी दिनेश खाके (२८, रा. कसोप सडा, मूळ रा. कुर्णे खाकेवाडी ता. लांजा) असे मृत महिलेचे नाव आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
सलोनी या पती दिनेश खाके याच्यासोबत १ मार्च रोजी कारने ठाणे येथे कपडे खरेदीसाठी गेल्या होत्या. २ मार्च रोजी परत रत्नागिरीच्या दिशेने येत असताना रात्री २.३० वा. पाली-खोपोली रस्त्यावरील कुरवले फाटा येथे म्हैस आडवी आल्याने त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या सलोनी यांना उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते. येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशी नोंद पोलिसात करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.