लांजात मठ येथे बंदुकीची गोळी लागून 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू

लांजा:- ठासणीच्या बंदुकीची गोळी लागून 20 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू होण्याची घटना लांजा तालुक्यातील मठ बंडबेवाडी येथे शुक्रवार 24 डिसेंबर रोजी रात्री घडली आहे. या घटनेप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात शनिवारी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.         

दरम्यान या वीस वर्षीय तरुणाकडे ठासणीची बंदूक आली कुठून असा प्रश्न या घटनेने निर्माण झाला असून या दृष्टीने लांजा पोलिसांचा तपास वेगाने सुरू झाला आहे .मात्र शनिवारी याबाबत कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.         

लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओंकार सुभाष बंडबे असे या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे .ओमकार बंडबे याला शुक्रवारी २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ठासणीच्या बंदूकीची  छातीत गोळी लागून त्याचा जागीच मृत्यू झाला होता. त्या तातडीने पाली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या ठिकाणी त्याला मृत घोषित केले होते.         

याप्रकरणी लांजा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेबाबत ओंकार बंडबे यांच्या आईवडिलांची कोणत्याही प्रकारची तक्रार नाही. उलटपक्षी ओमकार याला शिकारीचा नाद होता आणि त्यातूनच मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र ओमकार बंडबे या युवकाकडे ही ठासणीची बंदूक आली कुठून हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न या घटनेनंतर निर्माण झाला आहे. त्यामुळे ओंकार बंडबे यांच्या मृत्यूचे गूढ निर्माण झाले आहे. याबाबत शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात या घटनेबाबत शेजारीपाजारी आणि इतर ग्रामस्थांचा जाबजबाब सुरू होता. मात्र कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता त्यामुळे ओंकार बंडबे यांच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

.