लांजात पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात तिघेजण जखमी

लांजा:- पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात तिघेजण जखमी झाले आहेत . यातील दोघांचे या कुत्र्याने चांगलेच लचके तोडले आहेत .

लांजा तालुक्यातील वेरळ गावी शुक्रवार १० नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे . जखमी झालेल्या तिघांना तातडीने रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे . पिसाळलेल्या कुत्र्याने वेरळ गावात धुमाकूळ घातला आहे . या कुत्र्याने शुक्रवार १० नोव्हेंबर रोजी तिघाजणांवर हल्ला केला . या हल्ल्यात जयवंती पानकर यांना खाली पाडून त्यांच्या खांद्याचा जोरदार चावा कुत्र्याने घेतला .

त्याचप्रमाणे शिवाजी पातेरे यांचादेखील त्याने चावा घेतला . तर कार्तिक मंगेश डाकवे या मुलावर हल्ला करून त्याच्या मानेजवळ चावा घेतला आहे . तिघांवर हल्ला करून या कुत्र्याने जखमी केल्याने वेरळ गावात कुत्र्याची दहशत निर्माण झाली आहे . दरम्यान , कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांना प्रथम लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले . याठिकाणी प्राथमिक उपचार करून त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . या कुत्र्याने गुरूवारी वेरळ जवळच्या आंजणारी गावातील चारजणांचा चावा घेऊन त्यांना जखमी केले होते . यामध्ये अनिशा राजेंद्र शिखरे , अर्थ परेश कांबळे , पार्थ संतोष नरीम व अन्य एक अशा चार शालेय मुलांचा समावेश आहे .