लांजात पादचाऱ्याला ठोकर देऊन रिक्षा चालक फरार

लांजा:-मुंबई – गोवा महामार्गावरून चालत जात असताना पाठीमागून येणाऱ्या रिक्षाने धडक दिल्याने पादचारी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी ३ जून रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास लांजा बस स्थानका समोर घडली. मात्र पादचाऱ्याला ठोकर देऊन रिक्षाचालकाने पलायन केले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षाने लांजा एसटी स्टँड समोर सचिन यशवंत किंजळे (वय ४० राहणार देवधे) या पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर रिक्षाचालकाने तेथून पलायन केले. याच दरम्याने रत्नागिरी येथून लांजा येथे येणाऱ्या श्रेयश अनंत शेट्ये ( २८ राहणार रेस्ट हाऊस लांजा) यांनी ही घटना पाहिली असता त्यांनी याबाबतची खबर लांजा पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमी सचिन किंजळे याला प्रथम लांजा ग्रामीण रुग्णालय आणि त्यानंतर अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघात प्रकरणी लांजा पोलिस ठाण्यात अज्ञात रिक्षा चालका विरोधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.