रत्नागिरी:- ढगांच्या गडगडाटासह परतीच्या पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. लांजा, राजापूर तालुक्यात झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने भातशेतीची दाणादाण उडाली आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सुचना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी दिले आहेत.
सोमवारी (ता. 12) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात जिल्ह्यात सरासरी 13.22 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड 15.40, दापोली 0.50, खेड 0.90, गुहागर 2.30, चिपळूण 1.20, संगमेश्वर 11.20, रत्नागिरी 22.40, लांजा 26.30, राजापूर 38.80 मिमी पाऊस झाला.
लांजा तालुक्यात रविवारी दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरु झाला. ढगफुटी सदृश्य अति मुसळधार पावसाने नद्या, नाले दुथडी भरुन वाहू लागले. किनार्याजवळ काही शेतकर्यांनी कापून ठेवलेले भात पुराच्या पाण्याबरोबर गेले. रत्नागिरी तालुक्यात जयगड, पोमेंडी, पावस, करबुडे, खेडशी, मिरजोळे यासह विविध भागात कापलेली भातशेती पाण्यात भिजली आहे. 48 तासाहून अधिक काळ कापलेले भात पाण्यात राहीले आहे. राजापूर, संगमेश्वर, मंडणगड, दापोली तालुक्यातील मुसळधार पावसाने धुमाकुळ घातला आहे. परतीच्या पावसामुळे भात मळ्यातचं आडवी झाली आहेत. सोमवारी पाऊस थांबला असला तरीही ढगाळ वातावरण होते. पुन्हा पाऊस पडेल अशी शक्यता आहे. त्यामुळे मळ्यात कापून ठेवलेले भात कुजून जाण्याची भिती शेतकरी व्यक्त करत आहेत.