जिल्हा आरोग्य अधिकारी; काटेकोर लसीकरणासाठी नियोजन
रत्नागिरी:- उपलब्ध साठ्यानुसार दापोलीमधील केंद्रांवर सुरळीतपणे लसीकरण मोहीम राबविण्याचा दापोली पॅटर्न रत्नागिरी पॅर्टन म्हणून राबवता येईल का याबाबत संबंधितांबरोबर चर्चा करण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी जिल्हा आरोग्य विभागाला दिल्या आहेत. तसेच रत्नागिरी शहरातील गोंधळ पुन्हा होणार नाही यासाठी नियोजन केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
बुधवारी (ता. 12) सायंकाळी उशिरा झालेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेत डॉ. जाखड यांनी दापोली पॅटर्न विषयी सविस्तर माहिती घेतली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी बबिता कमलापूरकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, हेल्पिंग हॅण्डचे सचिन शिंदे सहभागी झाले होते.
हा पॅटर्न यशस्वीपणे राबविण्यात यशस्वीपणे कार्यरत असलेल्या प्रसाद फडके यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. ‘दै. सकाळ’ने या पॅटर्नविषयी चांगले वार्ताकन केल्याचे यावेळी स्पष्ट केले. अपुरा साठा आणि नियोजनातील उणीव यामुळे जिल्हाभरात अनेक ठिकाणी गोंधळ उडत होता. यावर उपाय योजनांविषयी सीईओ डॉ. जाखड यांनी माहिती दिली. त्यात दापोली पॅटर्न काय आहे, याबाबत माहिती घेऊन, तो राबविता येईल का यावर अभ्यास करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या आहेत. डॉ. जाखड म्हणाल्या, ग्रामीण भागात नेटवर्कची अडचण असल्याने ऑफलाईन लसीकरण केले जात आहे. रत्नागिरी शहरात मिस्री हायस्कूल येथे लसीकरणावेळी मोठी गर्दी झाल्यानंतर नागरिकांची झुंबड उडाली होती. अशा घटना पुन्हा होवू नयेत याची खबदरदारी घेण्याच्या सुचना जिल्हा आरोग्य विभागासह नगर पालिकेला देण्यात आल्या आहेत.
ग्रामीण व शहरी भागात भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे. ग्रामीण भागात ऑनलाईन लसीकरण करताना अडचणींना सामोरे जावे लागते. प्राथमिक आरोग्य केंद्रांबरोबरच उप केंद्रस्तरावर लसीकरण सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहे. रोटेशन पद्धतीने ही मोहीम राबविली जाईल. प्रायोगिक तत्वावर रत्नागिरी शहरात अंपग व्यक्ती, जेष्ठ नागरिक यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. शहरी भागात लसीकरणासाठी अधिक गोंधळ होत आहे. त्यासाठी प्रभाग निहाय लसीकरणाचा विचार सुरु असून यासंदर्भात मुख्याधिकार्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. येत्या पंधरा दिवसात प्रत्येकाला लस मिळेल अशी व्यवस्था केली जात आहे.