रत्नागिरी:- कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शाळा बंद करण्याच्या निर्णयानंतर आता लग्न समारंभ, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक कार्ये, मेळावे, तसेच क्रीडा स्पर्धा आयोजन करताना परवानगी अत्यावश्यक करण्यात आली आहे. तहसीलदार आणि प्रांत स्तरावर परवानगी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत.
बंदिस्त सभागृहासाठी किंवा मोकळ्या जागेत इतर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक कार्ये आणि मेळाव्याच्या बाबतीत कोरोना विषाणूचा फैलाव होणार नाही याची दक्षता घेवून कार्यक्रमांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साथरोग अधिनियम 1897 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत जिल्हाधिकारी यांनी हा निर्णय घेतला आहे.
यामध्ये बंदिस्त सभागृहामध्ये किंवा मोकळया जागेत लग्न समारंभासाठी त्या- त्या तालुक्यातील तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेल्या व्यक्तींच्या मर्यादेत परवानगी देणेबाबत प्राधिकृत करण्यात येत आहे. बंदिस्त सभागृहासाठी किंवा मोकळ्या जागेत इतर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक कार्ये, मेळावे, तसेच क्रीडा संबंधीत परवानगी बाबतीत त्या- त्या उपविभागातील उपविभागीय अधिकारी ( महसूल ) यांना शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेल्या व्यक्तींच्या मर्यादेत परवानगी देणेबाबत प्राधिकृत करणेत येत आहे.