लग्नात मटण- वडे न दिल्याच्या गैरसमजातून मारहाण; दोघेजण जखमी

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील साडवली पातेरेवाडी येथे हळद काढणीच्या जेवणावळीत मटण वडे घातले नाही असे दुसर्‍याजवळ बोलत असताना आपल्यालाच उद्देशून बोलल्याचा गैरसमज करुन घेत चौघांनी मारहाण केली. या मारहाणीत महिला व पुरुष जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत पातेरे (53, साडवली, पातेरेवाडी) वाडीतील हळद काढणीचे कार्यक्रमाला गेले होते. तेथे त्यांना परिचयाचा माणूस भेटल्याने त्याच्याशी बोलत असताता ‘तुझ्या लग्नात तू आम्हाला मटण वडे दिले नाहीस आता हे तरी मटण वडे नीट खा‘ असे म्हणाले. हे शेजारी असलेल्या रोशन पातेरे (25), रोहिदास पातेरे (21), रवींद्र पातेरे (60), राजेंद्र पातेरे (50, सर्व रा. साडवली, पातेरेवाडी, संगमेश्वर), यांनी ऐकले. आपल्यालाच उद्देशून बोलल्याचा गैरसमज करुन घेतला. चंद्रकांत पातेरे हे जेवून घरी जात असताना चौघांनी त्यांना वाटेत धरले. तुला मस्ती आलेय काय? तुला बघून घेतो असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर चौघांनीही काठीने, हाता-पायावर, नाकावर मारहाण करत जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. चंद्रकांत यांच्या ओरडण्याच्या आवाजाने त्यांची मुलगी तिथे आली असता चौघांनी तिला हाताचे थापटाने मारहाण करुन जखमी केले. या मारहाणीत चंद्रकांत पोतेरे व त्यांची मुलगी सौ. मयुरी झेपले हे दोघे जखमी झाले आहेत.

याबाबतची फिर्याद चंद्रकांत यांनी देवरुख पोलीस स्थानकात दिली. पोलिसांनी चौघांवर भादविकलम 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.