लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; तरुणावर गुन्हा दाखल

दापोली:- दापोली तालुक्यातील केळशी येथे तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर संशयित तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. मुदस्सीर दाउद अल्बा (केळशी किनारा मोहल्ला, दापोली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुदस्सीर अल्बा हा पीडित तरुणीचा मावस भाऊ आहे. तो पीडितेच्या घरी येत-जात असे. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. फेब्रुवारी 2012 पासून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. या दरम्यान मुदस्सीर याने पीडितेला मी तुझ्याशी लग्न करणार आहे असे सांगितले. पीडितेचा त्याच्यावर विश्वास बसला. दरम्यान पीडितेच्या घरी कोणी नसताना मुदस्सीर याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. मात्र 2016 मध्ये मुदस्सीर हा नोकरीनिमित्त सौदी अरेबियाला गेला. तरीही दोघांच्यात मोबाईलवर संभाषण चालू होते. 2020 मध्ये पीडित तरुणीचा मोबाईल बंद पडला. त्यामुळे दोघांचे बोलणे बंद झाले. त्यानंतर 16 सप्टेंबर 2022 मध्ये मुदस्सीर हा आपल्या घरी केळशी येथे आला होता. 18 सप्टेेंबर 2022 रोजी त्याने पुन्हा पीडितेला लग्न करणार असल्याचे सांगितले. यावेळीही मुदस्सीर याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यावेळी पीडित तरुणीने त्याला विचारले तू लग्न कधी करणार यावर मुदस्सीर याने सांगितले की, मी लग्न करायला तयार आहे पण माझ्या आईला तू पसंत नाही. त्यामुळे मी तुझ्यासोबत लग्न करु शकत नाही. या वाक्याने पीडितेच्या पायाखालची वाळू सरकली. लग्नाचे आमिष दाखवून आपल्याशी शारीरिक संबंध करत फसवणूक केल्याप्रकरणी पीडितेने दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुदस्सीर याच्या लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.