लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या साळवी स्टॉप येथील तरुणाला 10 वर्ष सश्रम कारावास

रत्नागिरी:- मैत्री करुन करुन लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करणाऱ्या प्रतिक विलास गांगण (३६.रा.साळवी स्टॉप) याला न्यायालयाने तीन कलमा अन्वये प्रत्येकी १० वर्ष सश्रम कारावास व १५ हजारांचा दंड ठोठावला आहे.

पिडीत तरुणी शिक्षण घेत असलेल्या अभ्यासक्रमाच्या ठिकाणी आरोपी प्रतिक हा कार्यालय प्रमुख होता.संबधीत तरुणीशी ओळख निर्माण करुन त्याने आपले कार्यालय पिडीतेला प्रवेश होण्यासाठी उपलब्ध करुन दिले होते. त्यातून त्यांची मैत्री झाली. त्यानंतर प्रतिकने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केले. त्या तरुणीने हि गोष्ट नातेवाईकांना सांगितल्यानंतर  दि.१९ नोव्हेंबर रोजी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. संबधीत गुन्हा दि. २९ जून ते दि. ३१ ऑक्टोबर २०१६ या कालवधीत घडला होता.अल्पवयीन तरूणीच्या तक्रारीवरुन शहर पोलीसांनी प्रतिक विरोधात भा.द.वि.क.३७६, पोक्सो-३,४, ५ (फ)(जे)(२) व ६ नुसार गुन्हा दाखल केला होता.तपासानंतर दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. खटल्याची सुनावणी पुर्ण झाल्यानंतर न्यायालयाने कलम ३७६ अन्वये -१० वर्ष सश्रम  कारावास व ५,०००/‚ रु.दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास, कलम ४ अन्वये-१० वर्ष सश्रम  कारावास व ५,०००/‚ रु.दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास, कलम ६ अन्वये ‚ १० वर्ष सश्रम  कारावास व ५,०००/‚ रु.दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाच्यावातीने ॲड.श्रीम. मेघना नलावडे, ॲड.अनिरुद्ध फणसेकर यांनी काम पाहिले.तर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक विक्रमसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे.काॅ.उदय चांदणे यांनी केला होता. तर पैरवी म्हणून पोउनि श्री. रोहन दणाणे,महिला पो.हे.काॅ.सोनाली शिंदे यांनी काम पाहिले होते.