रत्नागिरी:- राज्यात जनावरांना होणार्या लम्पीस्कीनचा फास दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. जिल्ह्यात सध्या ‘लम्पी’चा एकही रुग्ण सापडला नसला तरी पशुपालकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. दुसर्या बाजूला पशुसंवर्धन विभागात सुमारे 113 पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपचार आणि लसीकरण करताना यंत्रणेला ‘धाप’ लागत आहे. दुर्दैवाने संसर्ग वाढलाच तर आहे त्या मनुष्यबळावर यंत्रणा चालवणे अवघड होणार आहे. त्यामुळे वेळीच याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो. बळीराजा शेती करीत जोडधंदा म्हणून पशुधनाचा व्यवसाय करतात. यामुळे अनेकांच्या संसाराला हातभार लागतो. मात्र कोरोनामुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे. अशातच लम्पीस्कीनने शेजारील जिल्ह्यात (सांगली, कोल्हापूर) एन्ट्री केल्याने पशुपालकांत धास्ती आहे.
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे जिल्ह्यात आणि राज्य शासनाने असे एकूण 150 पशुसंवर्धन विभागाचे दवाखाने आहेत. याच दवाखान्यामार्फत उपचार करण्यात येतात. मात्र जिल्हा पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकार्यांची 33 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 12 जणच कार्यरत आहेत. 21 पदं रिक्त आहेत. पशुधन पर्यवेक्षक 78 पद मंजूर आहेत. त्यापैकी 34 पदं भरली असून 44 पदं रिक्त आहेत. तर व्रणोपचारक 2 पदे रिक्त आहेत. तर ‘ड’ वर्गातील 115 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 69 पदे भरली असून 46 पदे रिक्त आहेत. एकूण 113 रिक्त पदांमुळे उपचार करताना यंत्रणेला धाप लागत आहे. अनेक वर्षापासन पशुसंवर्धन विभागात भरती झालेली नाही. कधी होईल हे सांगता येत नाही. सुदैवाने लम्पीस्कीन बाधित जनावराचा मृत्यू झालेला नाही. मात्र प्रादर्भाव वाढल्यास आहे त्या उपचार करणे शक्य होणार नाही.
जिल्ह्यात 2 लाख 46 हजार जनावरे आहेत. सध्या ती सुरक्षित आहेत. लम्पीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग अर्लट झाला आहे. विविध उपक्रम हाती घेतले आहेत. बाधित जनावरांना तात्काळ वेगळे करावे. गोठ्यात फवारणी करावी. डास, माशा, गोचिड होणार नाही याची दक्षता घ्यावी. साथीचा आजार सुरू असेपर्यंत बाजारातून जनावरांची खरेदी-विक्री थांबवावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त, रत्नागिरी डॉ.जी.एस.जगदाळे यांनी केले आहे.