रत्नागिरी:- तालुक्यातील नेवरे- सोहमनगर येथील रो-हाऊस स्वस्तात विकत घेऊन देतो सांगून ५१ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरला जयगड पोलिसांनी अटक केली . न्यायालयाने आरोपी बिल्डर सतीश प्रभाकर आगाशे याला एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत .
गणपतीपुळे येथील मिलिंद चिंतामण दाते यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी ही कारवाई केली . रत्नागिरी तालुक्यातील नेवरे सोहमनगर येथे प्रशांत रणपिसे यांच्या मालकीचा रो – हाऊस विकणार की नाही याची कोणतीही माहिती नसताना आरोपी बिल्डरने तो रो-हाऊस विकायचे आहे असे मिलिंद दाते यांना भासवण्यात आले . ही मालमत्ता स्वस्तात मिळवून देतो असे आरोपीने आमिष दाखवल्याने एका कंपनीतून निवृत्त झालेले मिलिंद दाते यांना विश्वासात घेतले . या संदर्भात व्यवहार ठरवण्यासाठी गणपतीपुळ्यातील एका हॉटेलमध्ये जून २०२१ ते ऑगस्ट २०२३ या मुदतीत बैठका झाल्या . यातून ५१ लाख रुपयांचा व्यवहार ठरल्यानंतर आरोपी बिल्डरला फिर्यादीने ५१ लाख रुपये दिल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. आरोपी बिल्डर पाठपुरावा करूनही घेतलेली रक्कम परत देत
नसल्याचे पाहून २० ऑगस्ट २०२३ रोजी दाते यांनी जयगड पोलिसांकडे तक्रार केली . गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी आगाशे पोलिसांना मिळून येत नव्हते . आरोपी मूळचा वारजे पुण्याचा असून , ते गणपतीपुळ्याला येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली . त्यानुसार तपास करणारे पोलिस उपनिरीक्षक क्रांती पाटील यांनी पाळत ठेवून पकडले. शुक्रवारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत . पोलिसांतर्फे विशेष सहायक सरकारी वकील नाचणकर यांनी काम पाहिले.