रत्नागिरी:- महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत गावातील लाभार्थ्याला लखपती’ बनविण्याच्या योजनेंतर्गत दहा गावांचा 210 कोटी 41 लाखाचा आराखडा बनविण्यात आला आहे. यामध्ये पुढील दहा वर्षात 33 लाख 94 हजार मनुष्यदिन निर्मिती करता येणार आहे.
राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून कोट्यवधी रुपयांची तरतुद आहे. ही योजना रत्नागिरी जिल्ह्यातही राबवली जात आहे. यामधून सार्वजनिकसह वैयक्तिक कामेही घेणे शक्य आहे. विकास कामांबरोबरच गावातल्या गावात लोकांना रोजगाराचे साधन यामधून उपलब्ध होते. तसेच आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण होत आहेत. मे महिन्यामध्ये मनरेगातर्फे दहा गावे निवडण्यात आली होती. प्रत्येक तालुक्यातील एका गावाचा समावेश आहे. त्या गावातील प्रत्येक घरात जाऊन मनरेगामधून कोणती कामे घेता येऊ शकतात याचा आराखडा बनविला आहे. 210 कोटी 33 लाखाची कामे करता येणार आहेत. यामध्ये वैयक्तिक 9 हजार 721 तर सार्वजनिक सुमारे 700 कामांचा समावेश आहे. यामध्ये कुशल आणि अकुशल कामांसाठी निधी दिला जातो. याची अंमलबजावीण पुढील दहा वर्षे केली जाणार असून दरवर्षी या कुटूंबांकडून कामाचे प्रस्ताव घेतले जाणार आहे. यामधून प्रतिदिन 256 रुपये रोज दिला जातो. दहा गावांमध्ये सर्वाधिक 1 हजार 796 कामे शोषखड्डे, नाडेपची 1 हजार 217 तर फळबाग लागवडीची 1 हजार 008 कामे आहेत. मनरेगातू सिंचन विहिर, शोषखड्डे, नाडेप, घरकुल, शेततळे, शौचालये, फळबाग लागवड, गांडुळ खत, गुरांचा गोठा, शेळी पालन शेड, कुक्कुट पालन शेड, ढाळीचे बांध, विहिर पुनर्भरण, आझोला, मोहगणी, शेत सपाटीकरण, वैयक्तिक रोपवाटीका, बांध बंदिस्ती, दगडी बांध, माती बांध, तुती लागवड, पडक जमिन वृक्षलागवड, रस्ते, बांबू लागवड, किचनशेड, स्मशानभुमि दुरुस्ती, अस्तीकरण शेततळे, सीसीटी, मत्स्यशेती यासह सार्वजनिक कामांचाही समावेश आहे.