रोजगारासाठी तरुणांनो लघु उद्योजक बना: रोहन बने 

रत्नागिरी:- जिल्ह्यातील विविध महामंडळांच्या योजना तळागाळातील तरुणांपर्यंत पोचत नाहीत. त्यामुळे यंदा 40 टक्केच लाभार्थ्यांना यश मिळाले आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात बेरोजगारीची समस्या वाढलेली आहे. त्यावर मात करण्यासाठी तरुणांनी लघू उद्योग सुरु करायला हवेत. यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, आर्थिक विकास महामंडळ, बँका यांनी गावागावात जाऊन योजना तरुणांपर्यंत पोचवा अशा सुचना जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी दिल्या आहेत.

अध्यक्ष रोहन बने यांनी सोमवारी (ता. 1) जिल्हा उद्योग केंद्र, शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, उमेद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, खादी ग्राम उद्योग आदी कार्यालये व काही बँका यांचे प्रतिनिधी यांच्यासमवेत उद्योजकता वाढीच्या अनुषंगाने बैठक आयोजित केली होती. यावेळी विविध महामंडळांमार्फत राबविण्यात येणार्‍या योजनांचा आढावा घेतला. सर्वच ठिकाणी 40 ते 50 टक्केच प्रस्ताव प्राप्त झाल्याचे निदर्शनास आले. रत्नागिरी जिल्ह्यात लघू उद्योग सुरु करण्यासाठी अनेक योजना आहेत. तसेच आर्थिक सवलतीच्या योजना देखील आहेत. काही वेळा त्या योजनांची तळागाळापर्यंत अंमलबजावणी होत नाहित. काही बँका कर्ज देताना सहकार्य करत नाहित. सध्या युवकांना उद्योजकतेकडे वळविल्यास त्यांच्या माध्यामतून ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. मात्र या सगळ्यासाठी या योजनांबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी या विभागांच्या वतीने ग्रामीण भागात बैठका, मेळावे आयोजीत करण्यात यावेत असे आवाहन अध्यक्ष रोहन बने यांनी केले.