रेल्वे स्टेशन येथे पेपर विक्रेत्या रिक्षावाल्याला मारहाण

रत्नागिरी:- रत्नागिरी रेल्वेस्थानक येथे प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्या रिक्षावाल्यांना परतीच्या प्रवासात प्रवाशांची गरज भासते. त्यावेळी ते महामार्गावर स्टेशनच्या बाहेर रिक्षा लावतात आणि प्रवाशांची प्रतिक्षा करत असतात. कारण आजच्या महागाईच्या काळात विनाप्रवासी रिक्षा आणणे परवडत नाही. अशा रिक्षावाल्यांना दरदिवशी दमदाटी सहन करावी लागत आहे. मात्र रत्नागिरी आरटीओ आणि वाहतूक शाखेचे याकडे लक्ष नसल्याचे बोलले जाता आहे. या ठिकाणी मुजोरगिरी आणि दादागिरी यांचा अनुभव अनेक रिक्षाधारक घेत असून आज सकाळी एका रिक्षावाल्याची मुजोरगिरी समोर आली. त्याने एका पेपर विक्रेत्या रिक्षावाल्याला रत्नागिरी रेल्वेस्थानकाबाहेर मारहाण केली आहे. या घटनेनंतर रिक्षा चालकाने पोलिस स्टेशन रत्नागिरी येथे तक्रार देण्यास धाव घेतली आहे. पेपर विक्रेत्या रिक्षाचालकाला झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यात येत आहे. ज्या मुजोर रिक्षा चालकाने त्या गरीब स्वभावाच्या बाजारपेठ येथे राहण्याऱ्या रिक्षावाल्याला तातडीने न्याय मिळावा यासाठी शहरातील रिक्षाचालकांनी देखील आवाज उठविला आहे.