तब्बल पाच महिन्यानंतर तक्रार दाखल
खेड:- कोकण मार्गावरून धावणाऱ्या ओखा एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचे 1 लाख 10 हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना आंजणी रेल्वेस्थानकादरम्यान घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष वामन चौकेकर (54 रा. शिरगाव-चौकेवाडी, सिंधुदूर्ग) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. ते 30 एप्रिल रोजी कोकण मार्गावरून धावणाऱ्या ओखा एक्सप्रेसने वसई ते कणकवली असा प्रवास करत होते. उशीखाली ठेवलेले सोन्याचे दागिने लंपास झाल्याचे लक्षात येताच त्यांना धक्का बसला. 5 महिन्यानंतर त्यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोकण मार्गावर यापूर्वीही दिवाणखवटीनजीक क्रोसिंगसाठी थांबणाऱ्या रेल्वेगाड्यांतील महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्याच्या घटना घडल्या होत्या. यामुळे याठिकाणी टोळी कार्यरत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र तरीदेखील रेल्वे प्रशासनाने ही बाब गांभिर्याने घेतली नव्हती. चोरट्यांनी दिवाणखवटीनंतर आता आंजणी रेल्वेस्थानकाकडे मोर्चा वळवला आहे.