रत्नागिरी:- अत्यवस्थ रुग्णांना दवाखान्यात नेणार्या रुग्णवाहिकांना रस्ता मोकळा करुन देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मात्र, तरीही रुग्णवाहिकेचा रस्ता अडविला तर संबंधितास 10 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. त्यामुळे वाहनधारकांनी या नियमांची कटाक्षाने अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
शहरातून दवाखान्यापर्यंत पोहोचताना रुग्णवाहिका चालकांना मोठी कसरत करावी लागते. जागोजागी झालेल्या वाहतूक कोंडीतून रुग्णवाहिका बाहेर काढत रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचविणे चालकांसाठी मोठे जिकरीचे असते. अनेक ठिकाणी निर्माण होत असलेली ही परिस्थिती लक्षात घेऊन आता वाहतूक नियम कडक करण्यात आले आहेत. रुग्णवाहिका त्याचप्रमाणे आग विझविण्यासाठी जाणार्या अग्नीशमन दलाच्या वाहनाचा रस्ता अडविला तर दंड लावण्याची तरतूद आहे. त्यामुळे प्रत्येकाने कर्तव्याचे आणि नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
नवीन वाहन कायद्यात ही तरतूद करण्यात आली असून, दंडाची रक्कमही वाढविली आहे. त्यामुळे नियम मोडणे परवडणारे नाही. रुग्णवाहिका, अग्नीशमन बंब अडविल्यास दंडाची तरतूद असली तरी प्रत्यक्षात जिल्ह्यात अशा पद्धतीने एकाकडूनही दंड वसूल झालेला नाही.
रुग्णांना दवाखान्यात नेणारी रुग्णवाहिका असो की आगीच्या घटनेवर नियंत्रण मिळविण्यासाठी जाणारा अग्नीशमन दलाचा बंद, दोन्ही वाहने अत्यावश्यक सेवेत मोडतात. त्यामुळे यापैकी कोणत्याही वाहनाचा रस्ता अडविला तर दंड वसूल करण्याचा अधिकार वाहतूक पोलीस कर्मचार्यांना दिला आहे.
वास्तविक पाहता, वाहनधारकांना शिस्त लागणे आवश्यक आहे. मात्र, वाहनचालक जागोजागी वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. त्यामुळे एखादा मोठा अपघातही घडतो. मात्र, तरीही वाहनधारकांना शिस्त लागत नसल्याने आता दंडाची रक्कम वाढविली आहे.