रिफायनरी विरोधकांच्या जीवाला धोका: विनायक राऊत

रत्नागिरी:- खासदार नारायण राणे यांनी राजापूर येथे मंगळवारी केलेल्या या वक्तव्यानुसार रिफायनरी विरोधकांना परत जाऊ देणार नाही अशी गंभीर धमकी दिली आहे. त्यामुळे रिफायनरीला विरोध करणारे आम्ही जन प्रतिनिधी आणि रिफायनरीला विरोध करणारे स्थानिक ग्रामस्थांचे प्रतिनिधी यांच्या जिवीतास धोका निर्माण झाला असल्याची गांभिर्याने दखल घेत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी माजी खासदार विनायक राउत यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.

या विषयाबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांना निवेदन सादर केले आहे. विषयाच्या अनुषंगाने रत्नागिरी सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार नारायण राणे यांनी रिफायनरी विरोधकांना जी गंभीर धमकी दिली आहे. याबाबतचे वर्तमान पत्रामध्ये बातम्या प्रसिध्द झालेल्या बातम्यीं कात्रणे निवेदनासोबत जोडली आहेत.

विनाशकारी रिफायनरी प्रकल्पाला यापूर्वी नाणार येथे सुध्दा प्रचंड विरोध झाला होता. तसेच बारसू येथे सुध्दा प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे तसेच मी आणि स्थानिक आमदार राजन साळवी तसेच शिवसेना पक्षाचे स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी सुध्दा रिफायनरीला विरोध करणाऱया स्थानिक ग्रामस्थांना पाठींबा देवून विनाशकारी रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला आहे. व सातत्याने रिफायनरी विरोधी आंदोलनामध्ये आम्ही सर्व सहभागी होत असतो. काल मंगळवार 9 जुलै रोजी खासदार नारायण राणे यांनी राजापूर येथे केलेल्या या वक्तव्यानुसार रिफायनरी विरोधकांना परत जाऊ देणार नाही अशी गंभीर धमकी दिली आहे.
खासदार नारायण राणे यांचा गुन्हेगारी वृत्तीचा पूर्व इतिहास पाहिल्यास साहजिकच रिफायनरीला विरोध करणारे आम्ही जन प्रतिनिधी आणि रिफायनरीला विरोध करणारे स्थानिक ग्रामस्थांचे प्रतिनिधी यांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. खासदार नारायण राणे यांच्या धमकीची आपण गांर्भियाने दखल घ्यावी व त्यांच्यावर योग्य ती पोलीस कारवाई करावी. तसेच रिफायनरीला विरोध करणाऱया आम्हा सर्वांच्या जिवीताचे रक्षण करावे, अशी मागणी उबाठा शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राउत यांनी केली आहे.