रत्नागिरी:- बारसु (ता. राजापूर) येथील रिफायनरीसाठी २९०० एकर जागा एमआयडीसीच्या ताब्यात आलेली आहे. नाटे येथील क्रुड टर्मिनल्ससाठी आवश्यक पाचणे एकर जागाही ताब्यात आली असून रिफायनरी प्रकल्पासाठीच्या चाचण्यांना काही लोकांनी परवानगी दिली आहे. उर्वरित ग्रामस्थांना प्रकल्पाचे फायदे समजावून सांगितले जातील. त्याची प्रक्रिया सुरु झाली आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच आमदार राजन साळवीं यांच्या केसालाही धक्का लागणार नाही अशी संरक्षण व्यवस्था महाराष्ट्र शासनाकडून दिली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
रत्नागिरी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, बेरोजगारांना जर रोजगार द्यायचा असेल तर रिफायनरी अतिशय महत्त्वाची आहे. नाहीतर आपण फक्त बेरोजगारीचे कारखाने तयार करू. बारसु रिफायनरीबाबतची सगळी भूमिका शेतकर्यांना पटवून दिली जाणार आहे. या परिसरात काही चाचण्या सुरु करण्यात आल्या आहेत. त्यासाठी काही ग्रामस्थांनी परवानगी दिली आहे. काहीनी अजुनही परवानगी दिलेली नाही, त्यांची लवकरच समजूत काढली जाईल. प्रकल्पाला विरोध करणार्यांना आम्ही रिफायनरीचे महत्व समजाऊन सांगणार आहोत. तेथील परिसर कसा सुजलाम सुफलाम होईल हे समजून सांगू आणि ग्रीन रिफायनरी म्हणजे काय हे देखील पटवून देऊ. ही प्रक्रिया सुरु झालेली आहे. चाचण्या करण्यासाठी ८४ ठिकाणी बोअर मारायची आहेत. त्यातील काहींना परवानगी मिळालेली आहे. नाटे येथे क्रूड टर्मिनलसाठी साठी ५०१ एकर जमीन लागणार आहे. त्या सर्व जमिनीची संमती पत्र मिळालेली आहेत. तेथे बोअर मारण्याचे काम शंभर टक्के पूर्ण झालेले आहे. उर्वरित ठिकाणी बोअर मारण्याच्या जागांपैकी २८ लोकांनी संमती दिलेली आहे. मात्र यासंदर्भात काही लोक गैरसमज पसरवत आहेत. २९०० एकर जागा एमआयडीसीच्या ताब्यात आलेली असून प्रकल्पांसाठीची निम्मी जागा आमच्याकडे आहे.
आमदार राजन साळवी यांनी रिफायनरी समर्थनाच्या घेतलेल्या भुमिकेवरुन विरोधकांनी त्यांच्या पोस्टरला शेण फासल्यानंतर साळवी यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी पुढे आली होती, याबाबत मंत्री उदय सामंत यांना विचारलं असता मंत्री उदय सामंत म्हणाले, आमदार राजन साळवी यांनी जी रिफायनरी समर्थनाची भूमिका घेतलेली आहे, त्यासाठी कोणाच्याही शिफारसीची आवश्यकता नाही. त्यांचे संरक्षण वाढवण्यात आलेले आहे, अजूनही संरक्षणात वाढ करायची गरज असेल तर चिंता नाही. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः पोलीस अधीक्षकांना सूचना करेन. रिफायनरीसाठी साळवींनी घेतलेला पुढाकार ही कौतुकास्पद बाब आहे. शासनाचे त्यांनी समर्थन केले आहे, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही अशी संरक्षण व्यवस्था महाराष्ट्र शासनाकडून त्यांना दिली जाईल.