रिक्षा उलटून वृद्ध ठार; दोघे जखमी

संगमेश्वर:- खड्ड्यात चाक गेल्याने रिक्षा उलटून संगमेश्वर तालुक्यातील पांगरी धारेखालचीवाडी येथील एक वृद्ध ठार झाला आहे. हा अपघात तालुक्यातील घोडवली फाटा येथे बुधवारी सकाळी झाला. गणपत रामा म्हादे असे या वृद्धाचे नाव असून, रिक्षाचालकासह दोघे जण जखमी झाले आहेत.

देवरुख पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, याबाबतची फिर्याद रिक्षाचालक संदीप श्रीपत गावडे यांनी दिली आहे. गावडे रिक्षा (एमएच ०८ एक्यू ४०४३) घेऊन गणपत दत्ताराम म्हादे यांना बुधवारी सकाळी दवाखान्यात घेऊन गेले होते. दवाखान्यातून घरी परतत असताना समोरून येणाऱ्या डंपरला बाजू देताना रिक्षाचे समोरील चाक खड्ड्यात गेल्याने रिक्षा उलटली.

अपघातात गणपत म्हादे यांना गंभीर दुखापत झाल्याने तत्काळ रत्नागिरी येथील खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली आहे. या अपघातात रिक्षाचालक गावडे आणि दत्ताराम म्हादे हे दोघे जखमी झाले आहेत. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल बाणे करीत आहेत.