रास, गरबा, दांडियाशिवाय साजरा होणार नवरात्रोत्सव 

रत्नागिरी:- गणेशोत्सवानंतर जिल्ह्यात सर्वत्र नवरात्रोत्सवाची धूम सुरू होणार आहे. घरोघरी घटस्थापनेनंतर जिल्ह्यात जवळपास ३६४ ठिकाणी दूर्गामातेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना ९२ ठिकाणी फोटो पूजन, ३७ हजार ५५९ ठिकाणी खाजगी तर २४९ ठिकाणी सार्वजनिक घटस्थापना करण्यात येणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी नियमाच्या अधीन राहून नवरात्रोत्सव साजरा करावा लागणार असून यावर्षी प्रथमच रास, गरबा आणि दांडिया शिवाय नवरात्रोत्सव साजरा करावा लागणार आहे. 

कोकणामध्ये पूर्वी ग्रामदेवतांच्या मंदिरांपुरताच घटस्थापना करण्यापर्यंत उत्सव मर्यादीत होता. मात्र ग्रामदेवतांच्या मंदिरांमध्ये घटस्थापना करण्याबरोबरच एखाद्या वाडीवस्तीवर देवीची मूर्ती आणून तिची स्थापना करून, दांडीयाचे कार्यक्रम आयोजित करण्याची प्रथा मागील काही कालावधीपासून वाढीस लागली आहे. काही भागांमध्ये मात्र ग्रामदेवतांच्या मंदिरासमोरच हा उत्सव मोठ्याप्रमाणात साजरा केला जातो. शहरांमध्ये मात्र गल्लोगल्ली व काही भागांमध्ये उत्सव साजरे करण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात ३६४ ठिकाणी देवींच्या मुर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. ९२ ठिकाणी देवीच्या फोटोंचे पूजन करून, दांडीया कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.जिल्ह्यात ३७ हजार ५५९ ठिकाणी खाजगी तर २४९ ठिकाणी सार्वजनिक घटस्थापना केली जाणार आहे. 

दरवर्षी नवरात्रोत्सव उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा करण्याची प्रथा आहे. मात्र यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवा पाठोपाठ नवरात्रोत्सव साजरा करण्यावर देखील बंधने आली आहेत. नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी शासनाने काही नियम व बंधने घालून दिली आहेत. या नियमांच्या अधीन राहून नवरात्रोत्सव साजरा कारावा लागणार असल्याने यावर्षी प्रथमच रास, गरबा आणि दांडिया स्पर्धे शिवाय नवरात्र उत्सव साजरा करावा लागणार आहे.

दरम्यान नवरात्र उत्सव सुरू होण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिले असल्याने मूर्ती शाळेत लगबग वाढली आहे. दुर्गा मातेची मूर्ती घडवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.