रत्नागिरी:- जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पिण्याचे पाणी दूषित असल्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून प्राप्त होत होत्या. यावर जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने नागरिकांना पाण्याची गुणवत्ता समजण्यासाठी संकेतस्थळावर माहिती अद्ययावत करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पाणी गुणवत्ताविषयक रासायनिक व जैविक तपासणीचे अहवाल आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत.
शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या या ऑनलाइन सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. महिन्यातून एकदा जिल्हा परिषदेच्या आरोग्य व पाणी स्वच्छता विभागामार्फत जिल्ह्यातील जलस्रोतांची अणुजैविक तपासणी करण्यात येते. तपासणीअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक जलस्रोताचे दर महिन्याला जलसुरक्षा रक्षकामार्फत पाणी नमुने गोळा करून ते तपासणीकरता जिल्हा प्रयोगशाळेत पाठवले जातात. जिल्हा प्रयोगशाळेत पाणी नमुन्यांची तपासणी केल्यानंतर दूषित नमुन्याचा आरोग्य विभागाला अहवाल दिला जातो. दूषित जलस्रोतांचे आरोग्य विभागामार्फत शुद्धीकरण करून पुन्हा तपासणी केली जाते. या अंतर्गत होणारे अहवाल आता शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत.
वर्षभरापूर्वीचे पण अहवाल या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे पाणी तपासणी अहवाल संबंधित जलसुरक्षकाच्या ई-मेलवर सुद्धा पाठवण्यात येणार आहेत. जिल्ह्यात सध्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनतर्फे पाणी गुणवत्ता सर्वेक्षण व सनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येणार आहे. 846 ग्रामपंचायतींमध्ये 7 हजार 790 सार्वजनिक स्रोतांची तपासणी होणार आहे. याचा सुद्धा अहवाल संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.