राष्ट्रीय खो-खो स्पर्धत रत्नागिरीच्या मृण्मयी, साक्षीची सुवर्ण भरारी

रत्नागिरी:- फलटण (जि. सातारा) येथे नुकत्याच झालेल्या किशोर-किशोरी राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सुवर्णपदकावर नाव कोरले. किशोरी संघात रत्नागिरीचे प्रतिनिधीत्व करणार्‍या मृण्मयी नागवेकर, साक्षी लिंगायत तर किशोर संघात अर्थव गराटे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावण्यात मोलाची भुमिका बजावली. या तिन्ही खेळाडूंवर जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींकडून शुभेच्छांच वर्षाव होत आहे.

राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्रच्या बलाढ्य संघापुढे अन्य राज्याच्या संघाची मात्रा चालू शकली नाही. साखळी सामन्यापासून ते अंतिम सामन्यापर्यंत महाराष्ट्रच्या दोन्ही संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. किशोरी गटातील उपांत्य सामना राजस्थानबरोबर तर अंतिम सामना कर्नाटकबरोबर झाला. किशोर गटामध्ये अंतिम सामना कर्नाटकबरोबर झाला होता. महाराष्ट्र संघात रत्नागिरीचे प्रतिनिधीत्व करणार्‍या रत्नागिरीच्या मृण्मयीने प्रत्येक सामन्यात आक्रमणात आपली चमक दाखवली. खेळाडू बाद करुन महाराष्ट्रला गुण मिळवून देण्यात तिचा सहभाग होता. साक्षी लिंगायत हीनेही चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. संगमेश्‍वर फणसवणे येथील अर्थव गराटेने किशोर गटात चांगला खेळ केला. किशोर संघाचे व्यवस्थापक विनोद मयेकर यांनीही आपली जबाबदारी योग्य पध्दतीने पार पाडली. रत्नागिरीच्या खेळाडूंनी केलेल्या समाधानकारक कामगिरीबद्दल पालकमंत्री उदय सामंत, उद्योजक किरण सामंत, रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय उर्फ बाळू साळवी, राज्य संघटनेचे माजी सचिव संदिप तावडे, प्रशांत देवळेकर, राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे, महाराष्ट्र संघाचे व्यवस्थापक विनोद मयेकर, प्रसाद सावंत यांच्यासह जिल्हा खो-खो असोसिएशनच्या सर्व पदाधिकार्‍यांनी सुवर्णपदक प्राप्त खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

किशोरी गटात सुवर्णपदक प्राप्त खेळाडू मृण्मयी आणि साक्षी यांच्यासह व्यवस्थापक विनोद मयेकर यांचा आर्यन क्लब आणि खो-खो परिवारातर्फे येथील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समितीच्या माजी सदस्य सौ. साक्षी रावणंग आणि संतोष रावंगण, श्री. रावणंग यांच्यासह खो-खो परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी सौ. रावणंग यांनी खेळाडूंचे अभिनंदन करतानाच भविष्यात अशाच पध्दतीने चांगले खेळाडू घडवावेत आणि रत्नागिरीचा झेंडा राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये फडकावावा असा विश्‍वास व्यक्त केला.