मेर्वीतील बिबट्याचा हल्ला; वन विभागाने पिंजरे लावले, गस्त वाढवली
रत्नागिरी:- तालुक्यातील मेर्वी-जांभूळआड येथे शेतकर्यावर हल्ला करणार्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आहे. त्याला पिंजर्यामध्ये जेरबंद करण्यासाठी बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उदयान येथील बचाव पथक काल रत्नागिरीत दाखल झाले आहे. अनेक ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत. बिबट्याने आपल्या बछड्याच्या सुरक्षिततेसाठी बचावात्मकदृष्टीने हा हल्ला केला, असावा अशी शक्यता वन विभागाने वर्तविली आहे.
मेर्वी जांभूळआड (ता, रत्नागिरी) येथील जनार्दन काशिनाथ चंदुरकर यांच्यावर शनिवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्याबाबत मेर्वी येथील पोलिस पाटील यांनी वन विभागास माहिती दिले. त्यानंतर वन विभागाने तत्काळ रुग्णवाहिकेची सोय करून जखमी चंदुरकर यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वन अधिकार्यांनी जखमी चंदुरकर यांची हॉस्पीटमध्ये जाऊन विचारपूस केली. तेव्हा मिळालेल्या माहितीवरून बिबट्याने हल्ला केलेल्या घटनास्थळाची पाहणी केली.हल्ला करणारा बिबट्या दोन लहान बछड्यांसोबत होता. ते ठिकाण हे श्री. बेहेरे यांच्या आंबा बागेतील आहे. या बागेतून आपण गुरे चरायला सोडून घरी परतत होतो. तेव्हा हा हल्ला झाल्याचे जखमी चंदुरकर यांनी सांगितले. बिबट्याने आपल्या बछड्याच्या सुरक्षिततेसाठी बचावात्मकदृष्टीने हा हल्ला केला असावा, असा अंदाज आहे. बिबट्यास जेरबंद करण्यासाठी या भागात वन विभागामार्फत पिंजरे लावण्यात आले आहेत. तसेच या परिसरामध्ये गस्त वाढविण्यात आली आहे. बिबट्याचा मागोवा घेऊन त्याला पिंजर्यामध्ये जेरबंद करण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उदयान (बोरिवली) येथील बचाव पथक रत्नागिरीत दाखल झाले आहे. नागरिकांवर होणारे हल्ले थांबविण्यासाठी वन विभागाने तत्परता दाखविली आहे.
आवश्यकता असेल तरच बाहेर पडा
नागरिकांना सायंकाळी सहा वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर तसेच शेतामध्ये जाऊ नये. रात्रीच्या वेळेस अत्यावश्यक असले शक्यतो फिरताना हातात काठी तसेच बॅटरी घेऊन बाहेर पडावे. बिबट्या दिसल्यास त्याचा पाठलाग करणे तसेच मागोवा काढत फिरणे हया बाबी प्रकर्षाने टाळाव्यात. परिसरामध्ये मनुष्य, पाळीव प्राण्यावर वन्य प्राण्यांकडून हल्ला झाल्यास तत्काळ वनविभागास कळविण्यात यावे, असे आवाहन रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी प्रियांका लगड यांनी केले आहे.