खेड:- तालुक्यातील बोरघर येथील जंगलमय भागात रानडुकर शिकार प्रकरणात आणखी एकाचा सहभाग असल्याचे समजते. या संशयिताच्या घरात कापलेल्या रानडुकराचे मांस ठेवल्याची माहिती समोर आली आहे. हा संशयित घराला कुलूप ठोकून पसार झाल्याची खात्रीशीर माहिती उपलब्ध झाली आहे. दापोली परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील, वनपाल सुरेश उपरे यांच्यासह पथक फरारीच्या मागावर असून प्रकरणाचा छडा लावण्यासाठी कसून तपास सुरू आहे.
रानडुकराची शिकार करणाऱ्या अजित नारायण कदम (रा. बोरघर-घोलपवाडी), आकाश बाळकृष्ण पवार (रा. बोरघर आदिवासीवाडी) या दोघांना न्यायालयाने २ दिवसाची कोठडी सुनावली. दोघेही. वनविभागाच्या कोठडीत आहेत. फासकीचा वापर करून शिकार करणाऱ्या दोघांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या शिकार प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचाही पडताळा वनविभागाकडून सुरू असतानाच आणखी एकाचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. अटकेतील संशयितांनी शिकार केलेल्या रानडुकराचे कापलेले मांस पसार झालेल्या संशयिताच्या घरी ठेवल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे. त्याच्या घरात ३० किलो डुकराचे मांस असल्याची चर्चाही सुरू आहे. हा संशयित घराला कुलूप ठोकून पसार झाल्याने वनविभागाच्या पथकाचा संशय आणखी बळावला आहे. अटकेतील दोघांनी शिकारीसाठी यापूर्वी बंदुकीचा वापर केला होता का, याचाही सखोल तपास केला जात आहे. या दोघांकडून आणखी काही धागेदोरे लागण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्या दृष्टीने विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई, सहा. वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील, खेडचे वनपाल सुरेश उपरे व पथकाने तपास गतिमान केला. रानडुकराची शिकार केल्याप्रकरणी दोघांना अटक केल्यानंतर यापूर्वीही गावातीलच काहींकडून रानडुकराची शिक्कार करण्यात आल्याची कुजबूज सुरू झाली आहे. २० ते २५जणांची टोळी कार्यरत असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यातील काहींकडे विनापरवाना ठासणीच्या बंदुका व बॉम्बगोळेही असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर त्या टोळीचा शोध घेवून शिकारीच्या वापरातील विनापरवाना ठासणीच्या बंदुका व बॉम्बगोळे ताब्यात घेण्याचे मोठे आव्हान वनविभागाच्या पथकासमोर आहे.
अटकेतील संशयित ग्रा.पं.चा शिपाई अन् एक सदस्य
रानडुकराच्या शिकारीप्रकरणी वनविभागाच्या पथकाने अटक केलेला अजित नारायण कदम हा बोरघर ग्रामपंचायतीत शिपाई पदावर कार्यरत आहे. तर दुसरा संशयित आकाश बाळकृष्ण पवार ह याच ग्रामपंचायतीचा सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांच्या अटकेने खळबळ उडाली आहे.