राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंबा व्यावसायिक करणार 23 डिसेंबरला धरणे आंदोलन 

रत्नागिरी:- अवकाळी पावसामुळे यंदाच्या हंगामात हापूस उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. शासनाला वारंवार निवेदने देऊनही त्याची दखल घेतली जात नाही. कोकणातील शेतकर्‍यांकडून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 23 डिसेंबरला मुंबईत आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती आंबा बागायतदार बावा साळवी यांनी दिली.

शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तुकाराम घवाळी, दिपक राऊत आदी उपस्थित होते. कोकणातील आंबा, काजू, नारळ आदी फळबागायतींमधून शेतकरी व शेतमजुर यांना रोजगाराची संधी उपलब्ध होते. अनेकांच्या कुटूंबाचे उदरनिर्वाहाचे हे एकमेव साधन आहे. गेली 15 वर्षे निसर्गाच्या बदलातुन वादळ, वारा व अकाली पाऊस, ढगाळ वातावरण, रासायनिक प्रदुषण यामुळे बागायतदार शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होत आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात आंबा, काजू आदी फळझाडांना चांगले मोहोर आले असतानाच अवकाळी पाऊस पडून मोहोरावर किड, करपा, बुरशी व भुरी आदी रोगांची लागण होऊन फळ पिकांची मोठया प्रमाणात हानी झाली आहे. अनेक शेतकर्‍यांनी स्वत:च्या कष्टाने फळबागांचे संगोपन करुन आंबा, काजू व्यवसायीकांनी पिक कर्ज घेतली. निसर्गाच्या बदलत्या स्थितीमुळे कर्जाची परतफेड होऊ शकलेली नाही. त्यामुळे बँकामार्फत न्यायालयांकडुन वसुलीचे मार्ग अवलंबुन शेतकर्‍यांकडून सक्तिने कर्जवसुली करण्याबाबतची कार्यवाहीही शेतकर्‍यांच्या जमिनी हडप करण्याच्या हेतुने केली जात आहे. कर्ज पुर्नघटनेबाबतही शासनाचे दुर्लक्ष होत आहे.

कोरोना कालावधीतही बागायतदार अडचणीत आले असतानाच गतवर्षी कोरोनामुळे निर्यात होऊ शकली नाही. त्याचा भार स्थानिक बाजारपेठेवर पडला होता. परिणामी अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. अनेक बागायतदारांची कर्जे थकित असून बँकांनी वसुलीच्या नोटीस धाडल्या आहेत. कर्ज भरले नाही तर मालमत्तेवर टाच आणण्याची तयारीही बँकांनी केली आहे. ही परिस्थिती अशीच राहीली तर आत्महत्या करण्याची वेळ सर्वसामान्य बागायतदारांवर येऊ शकते. यासाठी शासनाने वेळीच लक्ष घातले पाहीजे. बागायतदारांना या परिस्थितीत शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. याबाबत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना निवेदनेही दिली आहेत. त्यांच्याकडून हा प्रश्‍न सुटेल अशी आशाही बागायतदारांना आहे. कोकणातील शेतकर्‍यांकडून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 23 डिसेंबरला मुंबईत आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात कोकण हापूस आंबा उत्पादक व विक्रेता संघ, जिल्हा आंबा उत्पादक सहकार संघ, देवगड आंबा उत्पादक, केळशी उत्पादक संघ, आडीवरेतील मंगलमुर्ती संघ, समृध्द कोकण प्रदेश संघटना सहभागी होणार आहेत, असे बावा साळवी यांनी सांगितले.