रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावलेला आहे. तसेच विविध
नाविन्यपूर्ण उपक्रमही राबवले जात आहेत. याची दखल राज्य शासनाने घेतली असून, रत्नागिरी शिक्षण विभागाचे कौतुक केले आहे. तसे पत्र शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी शिक्षणाधिकारी वामन जगदाळे यांना पाठवले आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा हा दिवसेंदिवस उत्तम होत आहे. गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये तर जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांतील मुले अव्वल ठरत आहेत.
नुकत्याच झालेल्या केंद्र शासनाच्या ‘असर’ या संस्थेच्या अहवालानुसार रत्नागिरी जिल्हा हा राज्यात अव्वल ठरला आहे. त्याचबरोबर अंतराळ संशोधनाबाबत जिज्ञासा निर्माण व्हावी यासाठी नासा व इस्रो येथे गुणवत्ता विद्यार्थ्यांना नेण्यात आले. दोन दिवसांपूर्वी या मुलांची अमेरिका वारी झाली.
या सर्व पार्श्वभूमीवर शासनाने याची दखल घेतली आहे. अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले आहे. तसे पत्र जिल्हा परिषदेला सोमवारी प्राप्त झाले आहे.