कोकण साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणार्या नमिता कीर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन
रत्नागिरी:- राज्याच्या मराठी भाषा विकास संस्थेच्या नियामक मंडळावर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये मराठी भाषा विकास संस्था प्रतिनिधी म्हणून कोकण साहित्य क्षेत्रात महत्त्वाचे योगदान असलेल्या सौ.नमिता रमेश कीर यांची निवड करण्यात आली आहे.
मराठीच्या विकासाचे काम करणार्या महाराष्ट्रातील मराठी संस्थांच्या प्रतिनिधी म्हणून मराठी भाषा विकास मंडळावर नव्याने नियुक्त झालेल्या सौ. नमिता रमेश कीर यांचे मराठी साहित्य क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे असे आहे. मागील दहा वर्षांपेक्षा अधिक काळ त्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे मध्यवर्ती संमेलने, महिला संमेलने, युवा-बालसाहित्य चळवळीची उभारणी, कोकण प्रांतातील एकूण नऊ जिल्ह्यात साहित्य चळवळीचा विस्तार, वाढ करणे यासाठीही त्यांनी मोठे योगदान दिले आहे. तसेच सौै. कीर ‘झपूर्झा’ या वाङ्मयीन त्रैमासिकाच्या संपादक म्हणून अनेक वर्षे उत्तमरित्या कार्यरत होत्या. कविता संग्रह, गझलगाथा, निवडक झपूर्झा या पुस्तकांचे लेखन-संपादन, वृत्तपत्र, दिवाळी अंक, मासिके यातून सातत्याने लिखाण, दूरदर्शनवरील अनेक परिसंवाद, चर्चेत सहभाग अशा त्यांच्या विविधांगी कार्याचा या नियुक्तीमुळे यथोचित गौरव झाल्याच्या प्रतिक्रिया साहित्य क्षेत्रातून उमटत आहेत.