राज्य मंत्रिमंडळातील तीन बडे मंत्री आज कोकण दौऱ्यावर 

रत्नागिरी:-कोकणात राजकीयदृष्ट्या आजचा सोमवार महत्त्वाचा आहे. कारण राज्याच्या मंत्रिमंडळातील तीन बडे नेते कोकण दौऱ्यावर आहेत. युवासेना प्रमुख आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे सिंधुदुर्गमध्ये, उपमुख्यमंत्री अजित पवार रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये तर जलसंपदा मंत्री जयंत पाटील चिपळूण दौऱ्यावर आहेत. 

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्ष बांधणी, मागील काही दिवसांमध्ये कोकणात होत असलेल्या राजकीय घडामोडी, होत असलेले आरोप-प्रत्यारोप या पार्श्वभूमीवर या तिन्ही मंत्र्यांच्या दौऱ्याला नक्कीच महत्त्व आहे.

युवासेना प्रमुख आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांचा दौरा करतील. विशेष म्हणजे त्यांचा सिंधुदुर्गातील दौरा हा महत्त्वाचा असेल. देवगड नगरपंचायत निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या नगरसेवकांचा सत्कार करणार आहेत. मुख्य गोष्ट म्हणजे भाजपचे आमदार नितेश राणे यांचा गड म्हणून देवगड पाहिले जाते. पण नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेना मिळवलेला विजय हा चर्चेचा राहिला होता. अर्थात आदित्य ठाकरे विविध ठिकाणी भेटी देतील उद्घाटन करतील. शिवाय काही कार्यक्रमांना देखील उपस्थिती लावतील. असं असलं तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील काही कालावधीमध्ये होत असलेल्या घडामोडी, राणे विरुद्ध शिवसेना असा वाद, जिल्हा बँक निवडणुकीच्या वेळी झालेले राजकारण, शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरण यानंतर आदित्य ठाकरे पहिल्यांदा तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर येत आहेत.

कोकण म्हटलं की शिवसेनेचा बालेकिल्ला हे समीकरण. पण सध्या कोकणात शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरु आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस देखील पक्षबांधणी आणि पक्ष वाढीवर भर देताना दिसून येत आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ एकच आमदार कोकणात आहे. मागील काही वर्षांमध्ये पक्षाला मरगळ देखील आलेली आहे. प्रमुख नेत्यांचे झालेले दुर्लक्ष यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्त्व दिसेनासे झाले होते. पण काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कोकणात लक्ष घालायला सुरुवात केली. सुनील तटकरे, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी देखील कोकणात भेटीगाठी केल्या.

नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेसोबत एकत्र निवडणुका लढवल्या. यावेळी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाढलेल्या दिसून आल्या. सुनील तटकरे त्यांनी दापोली आणि मंडणगडमध्ये लक्ष घातल्याचे दिसून आलं. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेचा आमदार असलेल्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आपलं बळ वाढवत पक्ष बांधणी करत असल्याच्या चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात रंगल्या आहेत. याशिवाय शिवसेनेत सुरु असलेल्या अंतर्गत बंडाळीचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस कशी घेत आहे याबाबत देखील बोललं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या सर्व शक्यता फेटाळल्या आहेत. पक्षबांधणी, पक्षवाढीचा अधिकार सर्वांनाच आहे, त्यात वेगळं काय असा सवालही उपस्थित केला जात आहे. मात्र असं असलं तरी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे वाढलेले दौरे यावरुन 2024 साली कशा पद्धतीचे राजकारण होऊ शकते याबाबत चर्चा सुरु आहेत.