रत्नागिरी:- जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायाला चाप बसवताना राज्य उत्पादन शुल्क विभागाची पुरती दमछाक होत आहे. कारवाईसाठी या यंत्रणेकडे मनुष्यबळच अपुरे आहे. यामुळे कारवाई करताना मर्यादा येत आहेत.
रत्नागिरीतील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात अधीक्षक पदच सध्या रिक्त आहे. या पदाचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे. निरिक्षकांची ६ पदे आहेत. त्यापैकी एकच पद भरण्यात आले आहे. उप अधीक्षकाचे एक पद रिक्त आहे. लिपीक टंकलेखक यांच्या आठ पदांपैकी एक पद भरण्यात आले आहे. लघुटंकलेखकाचे एक पद रिक्त आहे. दुय्यम निरिक्षक आणि सहाय्यक निरिक्षकांची पदे रिक्त आहेत. जवानांच्या १९ पदांपैकी ११ पदे भरली आहेत. वाहनचालकांच्या ७ जागा असताना केवळ पाचच वाहनचालक कार्यरत आहेत. शिपायांच्या तीन जागांपैकी एकाच जागेवर शिपाई काम करत आहे.
अवैध दारुधंद्यावर छापे घालण्याचे काम उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून होते. रत्नागिरीच्या उत्पादन शुल्क विभाग कार्यालयात अनेक पदे रिक्त आहेत. अधीक्षकापासून लिपीक जवानांपर्यंत पदे रिक्त असल्यामुळे उत्पादन शुल्क विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही. यामुळे गावागावात हातभट्टीच्या दारु विक्रेत्यांचे फावले आहे. कारवाईच होत नसल्यामुळे अवैध दारुधंदे करणार्यांना कोणाची भीती राहीली नाही.
मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असलेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाकडून दारुधंद्यांवर अपेक्षेप्रमाणे कारवाई होत नाही. यापुर्वी महामार्गावर होणार्या दारुची वाहतूक उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक पकडत होते. पण गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारची कारवाई थंडावली आहे. लॉकडाऊनच्या काळात काही किरकोळ ठिकाणी अवैध धंद्यांवर कारवाई झाली.