राज्यातील सर्वाधिक उंच छत्रपती संभाजी राजांच्या पुतळ्याचे अनावरण

रत्नागिरीकरांची हजारोेच्या संख्येने उपस्थिती

रत्नागिरी:- ढोल-ताशांचा गजर, हलगीचा ताल, सनईचौघडे आणि फटाक्यांची आतषबाजीत राज्यातील सर्वात उंच असा छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते अनावरण झाले. छत्रपती संभाजी महाराजांचा जयजयकार करीत हजारो रत्नागिरीकरांनी छत्रपतींना मानवंदना दिली.

रत्नागिरीतील थिबापॉईंट येथे राजमाता जिजामाता उद्यानात छत्रपती संभाजी महाराजांचा हा पुतळा उभारण्यात आला असून, त्याचे अनावरण रविवारी सायंकाळी हजारो रत्नागिरीकरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पूजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, रनपचे मुख्याधिकारी तुषार बाबर, माजी उपनगराध्यक्ष बाळुदादा साळवी, मा. नगरसेविका दिक्षा साळवी, मा. नगरसेवक सुदेश मयेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख राहूल पंडीत, बिपीन बंदरकर यांच्यासह माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सुप्रसिध्द गायक स्वप्नील बांदोडकर व स्थानिक गायक कलाकारांनी याठिकाणी अनेक गीते सादर करीत उपस्थितांचा उत्साह वाढवला.
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळांचा विकास होत आहे. रत्नागिरी शहरानजीक गणपतीपुळे व पावस या गावांचा धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून ओळख निर्माण झाली आहे. परंतु रत्नागिरी शहरामध्ये रत्नदुर्ग किल्ला, लोकमान्य टिळक जन्मभूमी, स्वा. सावरकरांना ठेवण्यात आलेले कारागृह, पतीतपावन मंदिर, थिबाराजवाडा आदी पर्यटन स्थळे असतानाही, पर्यटक फक्त काही ठराविक ठिकाणांना भेटी देऊन परतत असतात. रत्नागिरीमध्ये अथांग समुद्रकिनार्‍यांसह पर्यटन स्थळांवर पर्यटकांनी थांबावे यासाठी आणखी नवीन उपक्रम पालकमंत्री उदय सामंत यांनी शहरामध्ये राबवले.
राज्यातील सर्वात उंचीचा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, श्री विठ्ठलाची 30 फूट उंच मूर्ती, रत्नदुर्ग किल्ल्यावरील शिवसृष्टी, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय संग्रहालय, प्राणी संग्रहालय उभारण्याचे काम सुरु असून यातील छत्रपती संभाजी महाराज व श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे काम पूर्णत्वाला गेले आहे.

छत्रपती संभाजी महाराजांचा हा पुतळा पाहण्यासाठी पर्यटक व रत्नागिरीकरांसाठी तीन दिवस मोफत ठेवण्यात आला असून, त्याचाही लाभ रत्नागिरीकरांना घ्यावा असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.


शहरातील माळनाका येथील शिर्के उद्यानामध्ये उभारण्यात आलेल्या 30 फूट उंच विठ्ठलाच्या पुतळ्याचे अनावरण सोमवारी होत असून, मारुती मंदिर येथून आयोजित वारकरी दिंडीसह या कार्यक्रमाला रत्नागिरीकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.